मुंबईः दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासंदर्भात आणि जागतिक व्यापाराबाबत केलेले आश्वासक विधान हे गुंतवणूकदारांसाठी दिलासादायी ठरले आणि सलग तीन सत्रातील पडझडीपासून फारकत घेत गुरुवारी प्रमुख निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्सने चांगली उभारी दाखवली.
सत्रारंभापासून वादळी अस्थिरता राहिलेल्या व्यवहारात, सेन्सेक्स एकेसमयी ८७३.५५ अंशांची मोठी झेप घेताना दिसला, तर दुपारनंतर तो कालच्या बंद भावाच्या तुलनेत ३५ अंशांनी घसरताही दिसला. तेथून त्याच्या फेरउभारीमुळे दिवसअखेर ३९७.७४ अंश (०.४९ टक्के) कमाईसह ८२,७८३.१८ या पातळीवर स्थिरावला. दुसरीकडे निफ्टीनेही सत्रांतर्गत २७८ अंशांच्या उच्चांकी कमाईवरून, जवळपास निम्म्याने नुकसान सोसले आणि दिवसअखेर १३२.४० अंशांची वाढ दर्शवत या निर्देशांकाने २५,२८९.९० या पातळीवर सकारात्मक बंद नोंदवला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडबाबत आक्रमक पवित्रा सौम्य करताना, सामंजस्याची भूमिका दर्शविल्याने जागतिक बाजारपेठेत परतलेल्या तेजीचे अनुकरण करत, सकाळी स्थानिक बाजार खुले झाले. चांगले तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सेवा कंपन्या तसेच वाहन कंपन्यांच्या समभागांत खरेदीचा बहर दिसला.
सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड, सन फार्मा, कोटक महिंद्र बँक, इंडिगो, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि एनटीपीसी हे शेअर्स वधारले. दुसरीकडे, टायटन, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी आणि एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरणीत राहिले.
आशियाई बाजारांमध्ये, जपानचा निक्केई २२५ निर्देशांक, शांघायचा एसएसई कंपोझिट निर्देशांक, दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक वाढीसह बंद झाले. युरोपीय बाजारपेठाही दुपारच्या सत्रात वाढीसह व्यवहार करत होत्या.
फेरउभारी टिकून राहिल काय?
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय महासंघावरील शुल्काच्या धमक्या मागे घेतानाच आणि संभाव्य भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत आशावादी वक्तव्ये ही स्थानिक बाजारासाठी उत्साहदायी ठरली. ज्यामुळे गुंतवणूकदारांना जोखीम पत्करण्यास प्रोत्साहन आणि खरेदीला चालना मिळाली, – गौरव गर्ग, संशोधन विश्लेषक लेमन मार्केट्स डेस्क
कंपन्यांच्या तिमाही कमाईच्या सुरुवातीची आकडेवारी ही सध्याच्या मूल्यांकन पातळीला न्याय देणारी नाही. मात्र मजबूत देशांतर्गत मागणीचे कंपन्यांच्या मिळकतीत प्रतिबिंब उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी तिमाही निकालांमध्ये ती स्पष्टपणे दिसेल, असा गुंतवणूकदारांना विश्वास आहे.– विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड
