मुंबई: सलग तिसर्‍या दिवशी तेजी कायम राखत, मुख्य निर्देशांक सेन्सेक्स गुरुवारी २२१ अंशांनी वधारला, तर निफ्टी २५,४०० वर स्थिरावला. लार्सन अँड टुब्रो या ब्लूचिप समभागांतील खरेदी आणि पुढील आर्थिक वर्षासाठी ६.८ टक्के ते ७.२ टक्के अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज वर्तवणार्‍या आर्थिक पाहणी अहवालातील आशावादामुळे बाजाराने उत्साही वळण घेतले. 

सत्रारंभीचे नुकसान भरून काढत, सेन्सेक्स २२१.६९ अंशांनी म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी वाढून ८२,५६६.३७ पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. सकाळच्या सत्रात हा निर्देशांक ६३६.७४ अंशांनी गडगडून ८१,७०७.९४ च्या नीचांकावर पोहोचला होता. दुसरीकडे निफ्टी ७६.१५ अंशांनी किंवा ०.३० टक्क्यांनी वधारून २५,४१८.१० पातळीवर बंद झाला. सकाळच्या सत्रात हा निर्देशांक देखील १८३ अंशांनी घसरला होता.

जागतिक बाजारातील तेजी आणि परदेशी गुंतवणुकीमुळे ताज्या प्रवाहामुळे प्रमुख निर्देशांकांना नीचांकी पातळीवरून सावरण्यास मदत झाली, असे विश्लेषकांनी सांगितले. सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी टाटा स्टीलच्या समभागात सर्वाधिक ४.४१ टक्क्यांची वाढ दिसून आली. ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत एकत्रित महसूल वार्षिक तुलनेत १० टक्क्यांनी वाढून ७१,४५० कोटी रुपयांवर नेणारी तिमाही कामगिरी जाहीर करणार्‍या लार्सन अँड टुब्रोचा समभाग ३.६६ टक्क्यांनी वाढला.

ॲक्सिस बँक, इटर्नल, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स आणि आयसीआयसीआय बँक यांचा देखील वाढलेल्या समभागांत समावेश होता. त्या उलट एशियन पेंट्स, इंटरग्लोब एव्हिएशन, मारुती आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स हे समभाग घसरले. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, देशात राबविलेल्या सुधारणांच्या एकत्रित परिणामामुळे भारताची अर्थव्यवस्था स्थिर पायावर असल्याचे अधोरेखित करणार्‍या आर्थिक पाहणी अहवालानुसार, अमेरिकेशी व्यापार करारासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी वर्षभरात पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

परिणामी बाह्य आघाडीवरील अनिश्चितता कमी होण्यास मदत होणे ही बाब बाजारासाठी दिलासादायी ठरली, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. तथापि रुपयातील कमजोरी आणि परकीय गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या मार्‍यामुळे निर्देशांकाच्या उभारीला मर्यादा पडल्या, असेही त्यांनी नमूद केले.