Sonu Nigam real estate investment Mumbai : प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम आपल्या आवाजासोबत बेधडक भूमिकांमुळे कायम चर्चेत असतो. मात्र, यावेळी सोनू एका मोठ्या रिअल इस्टेट व्यवहारामुळे चर्चेत आला आहे. रिअल इस्टेट डेटा विश्लेषक संस्था ‘सीआरई मॅट्रिक्स’च्या (CRE Matrix) अहवालानुसार, सोनू निगम यांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम एक अलिशान कमर्शियल ऑफिस खरेदी केले आहे. गेल्या काही वर्षांतील सोनू निगम यांनी मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढवल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रॉपर्टीच्या माध्यमातून सोनू निगम मोठी कमाई करतात.

अंधेरीतील ऑफिसचा किती कोटींना व्यवहार?

मिळालेल्या माहितीनुसार, सोनू निगमच्या या नव्या कमर्शिअल ऑफिसची किंमत साधारण १ कोटी रुपये आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्याचं हे नवीन हे कार्यालय अंधेरी पश्चिम येथे असून त्याचे क्षेत्रफळ २५८.३३ चौरस फूट इतकं आहे. ६ ऑगस्ट २०२६ रोजी या व्यवहाराची नोंदणी पूर्ण झाली. सोनू निगम यांनी या व्यवहारासाठी ६ लाख रुपये मुद्रांक शुल्क जमा केले असून ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरलं आहे.

कर्जतमध्ये जमिनींची विक्री: कोट्यवधींचे सौदे

मुंबईबाहेरही सोनू निगम यांनी रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. कर्जत येथे १.९ हेक्टरपेक्षा जास्त आकाराचे जमिनीचे ४ भूखडं १.९५ कोटी रुपयांना विकले आहे. त्यानंतर काहीच दिवसांत त्याच्या लगतच असणारे १.०६७ हेक्टरचे ५ भूखंडही ९५ लाख रुपयांना विकल्याची नोंद समोर आली आहे. यातून त्यांना मोठा नफा मिळाला.

सांताक्रूझमधील कमर्शियल प्रॉपर्टीतून दरमहा १९ लाखांचे भाडे!

सोनू यांनी सांताक्रूझ पूर्व येथील आपली ४,२५७ चौरस फुटांची कमर्शियल जागा ५ वर्षांच्या भाडेकराराने दिला आहे. या प्रॉपर्टीतून त्यांना पहिल्या वर्षी १९ लाख रुपयांचे दरमहा भाडे मिळत आहे. दुसऱ्या वर्षी ५.२६% वाढीसह २० लाख, त्यानंतर दरवर्षी ५% निश्चित वाढ करण्यात आली आहे. म्हणजे ५ वर्षांच्या कालावधीत सोनू निगम यांना या जागेतून तब्बल १२.६२ कोटी रुपयांचे भाडे मिळणार आहे.

कलाकारांचे रिअल इस्टेट प्रेम

बॉलिवूड आणि संगीत क्षेत्रातील कलाकार सहसा निवासी मालमत्तांमध्ये अधिक गुंतवणूक करतात. मात्र, सोनू निगम यांनी कमर्शियल रिअल इस्टेट आणि जमिनी खरेदी-विक्रीवर भर दिला आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अध्योध्येत दुसऱ्यांदा मोठा भूखंड खरेदी केला होता. किंग खान शाहरुख खाननेही गेल्याच महिन्यात दिल्लीतील उच्चभ्रू भागात एक संपूर्ण फ्लोअर खरेदी केला आहे. इकडे पुण्यातील मुलशी तालुक्यात रणबीर कपूरने २५ एकर जमीन खरेदी करत मोठी गुंतवणूक केली. एकंदरीत कलाकार या माध्यमातून गुंतवणूक आणि चांगला नफा कमावत असल्याचे दिसत आहे.