Raghuram Rajan on SpaceX Evaluation: एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या रॉकेट कंपनीने अमेरिकन शेअर बाजारातील नुकतेच पदार्पण केले. स्पेसएक्सचा हा आयपीओ जगातील सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे. यामुळे एलॉन मस्क हे जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ (एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेले व्यक्ती) बनले आहे. दरम्यान रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी यावर असा प्रश्न उपस्थित केला आहे की, “आपल्याला स्वप्ने दाखवली जात आहेत आणि पैशांची उपलब्धता सहज असलेल्या या काळात आपण ती स्वप्ने विकत घ्यायला तयार आहोत. प्रश्न हा आहे की, ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील का?”
एलॉन मस्क आणि स्पेसएक्सच्या आयपीओबाबत ईटी नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये रघुराम राजन म्हणाले, “मला फक्त एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की, स्पेसएक्सचे अनेक विभाग सध्या तोट्यात आहेत. काही विभाग नक्कीच नफा कमवत आहेत. उदाहरणार्थ, त्यांचे स्टारलिंक सॅटेलाइट नेटवर्क. पण असे अनेक विभाग आहेत जे नफा कमवत नाहीत. अशा परिस्थितीत आपण अशा एका कंपनीचे मूल्यमापन २ ट्रिलियन डॉलर्स इतके करत आहोत, जी प्रामुख्याने भविष्यातील शक्यतांवर जसे की चंद्रावर किंवा मंगळावर खाणकाम करणे यावर आधारित आहे.”
“सध्या एआय क्षेत्रावर ओपनएआय (OpenAI) आणि अँथ्रोपिक (Anthropic) यांसारख्या कंपन्यांच्या मॉडेल्सचे वर्चस्व आहे. थोडक्यात सांगायचे तर, आपल्याला स्वप्ने दाखवली जात आहेत आणि पैशांची उपलब्धता सहज असलेल्या या काळात आपण ती स्वप्ने विकत घ्यायला तयार आहोत. प्रश्न हा आहे की, ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील का? मला आशा आहे की ती उतरतील, पण हीच गोष्ट आपल्याला बारकाईने पाहावी लागेल”, असे रघुराम राजन यांनी पुढे नमूद केले.
मला भविष्याची अधिक चिंता वाटते
जगाच्या आर्थिक भविष्याबाबत बोलताना रघुराम राजन यांनी स्पष्टपणे म्हटले की, “जगातील सर्वात मोठ्या आयपीओनंतर स्पेसएक्सच्या मूल्यांकनात झालेली प्रचंड वाढ पाहता मला आजची नाही, तर भविष्याची अधिक चिंता वाटते. कारण महागाईचे संकट असतानाही आर्थिक परिस्थिती सुलभ राहिली आहे. तुम्हाला माहितच आहे की, गेल्या ५ वर्षांत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हला महागाईचा दर त्यांच्या उद्दिष्टाच्या आसपासही आणता आलेला नाही. सध्याची चर्चा हीच आहे की आर्थिक धोरणे अधिक शिथिल करायची की कमी शिथिल करायची. त्यामुळे मला काळजी वाटते, कारण जेव्हा पैसा सहज उपलब्ध असतो तेव्हा अनेक समस्या निर्माण होत असतात आणि त्या समस्या कालांतराने समोर येतात.”
स्पेसएक्समध्ये चिनी गुंतवणूक
जेव्हा स्पेसएक्स कंपनी खाजगी मालकीची होती, तेव्हा त्यात हिस्सेदारी मिळवणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांमध्ये चिनी लष्करी कंत्राटदारांशी संबंध असलेला एक व्यावसायिक आणि कतारच्या राजघराण्याशी संबंधित एका संस्थेचा समावेश होता. याबाबतचे वृत्त प्रोपब्लिकाने दिले आहे.
प्रोपब्लिकाच्या मते, ब्लूमबर्गच्या एका अहवालाचा हवाला देत स्पेसएक्सने गेल्या आठवड्यात “नियामक आणि अनुपालन जोखमींमुळे” चीन आणि हाँगकाँगच्या गुंतवणूकदारांना आपल्या आयपीओमध्ये सहभागी होण्यास मनाई केली होती.
या कागदपत्रांमध्ये चीन, हाँगकाँग किंवा रशियामध्ये पत्ते असलेल्या किमान डझनभर गुंतवणूकदारांची ओळख पटली आहे, ज्यांनी २०१८ ते २०२१ दरम्यान अमेरिकेतील मध्यस्थ टोमालेस बे कॅपिटलमार्फत स्पेसएक्समध्ये हिस्सेदारी खरेदी केली होती. गुंतवणूक सुमारे ८००,००० डॉलर ते ४० दशलक्ष डॉलर पर्यंत होती, असे प्रोपब्लिकाने सांगितले.
