Raghuram Rajan: आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर झोहो या तंत्रज्ञान कंपनीचे संस्थापक श्रीधर वेंबू यांनी टीका केली आहे. औद्योगिक धोरणाकडे पाठ फिरवून कारखान्यांमधील कमी पगाराच्या नोकऱ्यांबद्दल आपण तक्रार करू शकत नाही, असे ते म्हणाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रघुराम राजन यांनी भारताच्या देशांतर्गत सेमीकंडक्टर उद्योग विकसित करण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी नमूद केले की, चिपसेट्स या “जगातील सर्वात सहजपणे तस्करी केल्या जाणाऱ्या वस्तू” आहेत आणि चीन व रशियाकडून त्यांची आधीच मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात आहे.
रघुराम राजन यांनी पुढे तामिळनाडूचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “तुम्हाला कोणत्या प्रकारच्या उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या मिळत आहेत? उत्पादने असेम्बल करणाऱ्या उद्योगांमध्ये मिळणारा पगार हा चेन्नईमधील ड्रायव्हर किंवा घरकाम करणाऱ्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त नाही. तो दरमहा २०,००० रुपये आहे. तो काही फार चांगला नाही. आपल्याला अधिक चांगल्या नोकऱ्या कशा निर्माण करता येतील याचा विचार करायला हवा.”
श्रीधर वेंबू यांनी रघुराम राजन यांच्या या युक्तिवादावर एक्सवरील एक पोस्टच्या माध्यमातून टीका केली आहे. त्यांचा मुख्य युक्तिवाद भारताच्या आर्थिक मॉडेलवर केंद्रित होता, जे बौद्धिक संपदा (IP) निर्माण करण्यात आणि त्यावर मालकी हक्क मिळवण्यात अपयशी ठरत असताना सेवांच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.
“उच्च पगाराच्या नोकऱ्यांची आपल्याला गरज आहे हे मी मान्य करतो, त्या उच्च मूल्यवर्धनातून येतात आणि त्यासाठी आपण केवळ संशोधन आणि विकास करणेच नव्हे, तर भारतात बौद्धिक संपदेची मालकी घेणे आणि त्यातून होणारे आर्थिक मूल्यवर्धन मिळवणे आवश्यक आहे. तरच त्यांमधील पगारही वाढेल”, असे वेंबू यांनी पोस्टमध्ये लिहिले.
“डॉ. रघुराम राजन हे ‘शिकागो स्कूल’ नावाच्या आर्थिक सिद्धांताचे प्रतिनिधित्व करतात, जो मिल्टन फ्रीडमन यांच्या विचारांवर आधारित आहे. शिकागो स्कूल औद्योगिक धोरणाशी सहमत नाही. शिकागो स्कूलचे अनुसरण केल्यास आपण मेक्सिकोच्या आर्थिक परिस्थितीपर्यंत पोहोचू जिथे मोठ्या प्रमाणावर कमी मजुरीवर उत्पादन होते. पण जपान, तैवान, दक्षिण कोरिया आणि आता चीनपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. जपान, तैवान, दक्षिण कोरिया किंवा चीनपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ‘आशियाची कार्यप्रणाली कशी आहे’ हे समजून घेणे आवश्यक आहे. एकाच मुलाखतीत डॉ. राजन यांनी एकाच वेळी उच्च पगाराच्या नोकऱ्यांची इच्छा आणि आपल्याला तिथे पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणालाच विरोध करण्याची कला साधली आहे.” – श्रीधर वेंबू
