Strait of Hormuz Iran Toll Tax: होर्मुझची सामुद्रधुनी ही फार पूर्वीपासून जगातील सर्वात सामरिकदृष्ट्या संवेदनशील सागरी अडथळ्यांपैकी एक आहे. आता इराणला व्यापारी जहाजांकडून त्यांच्या मालाच्या मूल्याच्या ७% पर्यंत टोल शुल्क आकारून या सामुद्रधुनीला जगातील सर्वात फायदेशीर महसूल स्रोतांपैकी एक बनवायचे आहे. या निर्णयामुळे जागतिक सागरी वाहतुकीच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलू शकते आणि पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव आणखी वाढू शकतो.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराण आणि ओमान एका अशा करारावर चर्चा करत आहेत, ज्यामुळे आखातात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या सागरी वाहतुकीवर इराणला अधिक नियंत्रण मिळेल. या प्रस्तावानुसार, जहाजे येण्या-जाण्याच्या दोन्ही प्रवासांमध्ये इराणच्या प्रादेशिक सागरी हद्दीतून जातील, ज्यामुळे इराणला संभाव्यपणे टोल वसूल करता येईल.
इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी इराणच्या ‘इर्ना’ वृत्तसंस्थेला सांगितले की, टोल भरल्यानंतर जहाजे दोन्ही दिशांनी इराणच्या प्रादेशिक सागरी हद्दीतून प्रवास करू शकतील. त्यांनी असेही सांगितले की, जूनमध्ये स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारात नमूद केलेल्या बाबींवर चर्चा करण्यास अमेरिका तयार असल्याचे संकेत इरानला मिळाले आहेत.
विविध वृत्तानुसार, इराण जहाजात असलेल्या मालाच्या मूल्याच्या ५% ते ७% इतके टोल शुल्क आकारण्याचा आग्रह धरत आहे. तर दुसरीकडे, ओमानने ३% इतके कमी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडल्याचे समजते.
याबाबत अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही, तरीही या प्रस्तावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचे कारण म्हणजे जागतिक ऊर्जा व्यापारात या सामुद्रधुनीची असलेली अत्यंत महत्त्वाची भूमिका. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे एक-पंचमांश पुरवठा या अरुंद जलमार्गातून होतो. त्यामुळे, या मार्गातील कोणताही बदल ऊर्जा बाजारपेठा, विमा कंपन्या आणि जहाजवाहतूक कंपन्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो.
दिवसाला ३६ हजार कोटी रुपये कमाई
अंदाजानुसार, जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या सर्व व्यावसायिक वाहतुकीवर ७% टोल आकारला आणि वाहतुकीचे प्रमाण संघर्षपूर्वीच्या पातळीवर राहिले, तर त्यातून दररोज सुमारे ३८५ दशलक्ष डॉलर्सहून अधिक महसूल मिळू शकेल. ज्याचे भारतीय रुपयांत सुमारे ३६ हजार ६४७ कोटी रुपये मूल्य होते.
