Subhash Chandra Mukesh Ambani Controversy: एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यावर टीका केली आहे. रिलायन्सशी संबंधित प्रसारमाध्यम संस्था आपल्या आणि आपल्या समूहाविरुद्ध “चुकीचा प्रचार” करत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, त्यासोबतच ‘झी एंटरटेनमेंट’वरून झालेला कटू कॉर्पोरेट संघर्षही त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
मात्र, रिलायन्सने सुभाष चंद्रा यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. सुभाष चंद्रा यांची विधाने “निराधार” असल्याचे सांगत, कंपनीने स्पष्ट केले की त्यांच्या प्रसारमाध्यम संस्थाचा वापर कधीही कोणावरही टीका करण्यासाठी केला गेलेला नाही. तसेच, “एक व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून सुभाष चंद्रा यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे”, असे रिलायन्सने स्पष्ट केले.
एका व्हिडिओद्वारे सुभाष चंद्रा यांनी थेट अंबानी यांना उद्देशून बोलताना, त्यांच्या वैयक्तिक दिवाळखोरीच्या प्रक्रियेबाबतच्या प्रसारमाध्यमांमधील वृत्तांकनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, त्यांनी ‘झी-इन्व्हेस्को’ प्रकरणाचा आणि ‘झी’मधील रिलायन्सच्या स्वारस्याचाही उल्लेख केला. त्या वेळी ‘सोनी-झी’ विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“मुकेशजी, कृपया माझ्याबद्दल आणि माझ्या समूहाबद्दल केला जाणारा चुकीचा प्रचार थांबवा. ‘झी’ ही समूहातील एक कंपनी आहे. त्यात माझी वैयक्तिक मालकी नाही. NCLT चा आदेश लागू झाल्यानंतर आता तर माझी त्यात कोणतीही मालकी उरलेली नाही. तुम्ही धीरुभाई अंबानींचे सुपुत्र आहात. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. पण मला वाटते की, तुम्ही त्यांच्याकडून काहीही शिकलेला नाहीत”, असे सुभाष चंद्रा म्हणाले.
सुभाष चंद्रा हे त्यांच्या वैयक्तिक दिवाळखोरी प्रकरणाशी संबंधित वृत्तांचा संदर्भ देत होते. या प्रकरणात त्यांच्याविरुद्धचे मान्य केलेले दावे सुमारे २२,००६ कोटी रुपयांचे आहेत, तर ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल’ने मंजूर केलेल्या परतफेड योजनेत सुमारे ६.५ कोटी रुपयांचा समावेश आहे.
त्यांनी असा युक्तिवाद केला की, २२,००६ कोटी रुपयांची ही रक्कम त्यांनी स्वतः घेतलेले कर्ज असल्याचे भासवले जात होते. वास्तविक, हे दावे ‘एस्सेल ग्रुप’च्या कंपन्यांनी घेतलेल्या कर्जांसाठी त्यांनी दिलेल्या वैयक्तिक हमींवरून उद्भवले होते.
रिलायन्सने आरोप फेटाळले
रिलायन्सने आपल्या मीडिया कंपन्यांविरुद्ध चंद्रा यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. “एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष श्री. सुभाष चंद्रा यांनी केलेल्या निराधार विधानांची रिलायन्स ग्रुपने खेदासह दखल घेतली आहे. रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या मीडिया कंपन्यांविरुद्ध केलेले आरोप आम्ही ठामपणे नाकारतो. आमच्या मीडिया ब्रँड्सचा वापर कोणावरही टीका करण्यासाठी कधीही केला गेला नाही आणि भविष्यातही केला जाणार नाही. एक व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून आम्ही सुभाष चंद्रा यांचा आदर करतो”, असे रिल्यान्सने म्हटले आहे.
