Success Story Leaving a secure job at TCS, Shreya Tiwari built a income model earning 14 lakhs annually: सुरक्षित नोकरी आणि दर महिन्याला मिळणारा निश्चित पगार सोडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे सोपे नसते. मात्र, उत्तर प्रदेशच्या श्रेया तिवारीने हे आव्हान स्वीकारले. टीसीएसमधील नोकरीला रामराम ठोकून तिने आज स्वतःला एक यशस्वी उद्योजिका म्हणून सिद्ध केले आहे.
या निर्णयामुळे तिच्या आयुष्याला एक महत्त्वाचा कलाटणी मिळाली. आज ही व्यावसायिक तरुणी फ्रीलान्सिंग, कंटेंट क्रिएशन आणि स्वतःचा कपड्यांचा व्यवसाय या माध्यमातून वर्षाला जवळपास १४ लाख रुपये कमावते.
कौटुंबिक पार्श्वभूमी
मूळची उत्तर प्रदेशची आणि सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेली श्रेया तिवारी, अशा कुटुंबात वाढली जिथे आर्थिक परिस्थिती बेताची होती, मात्र कुटुंबात शिक्षणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले जात असे. तिचे वडील शेतकरी आहेत, तर तिची आई घराची जबाबदारी सांभाळण्यासोबतच, कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शिवणकामही करायची.
हिंदुस्तान टाईम्स या संकेतस्थळाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले, “मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे, जिथे आर्थिक संघर्ष ही एक नित्याचीच बाब होती. माझे वडील शेतकरी आहेत आणि आई गृहिणी आहे. आम्ही पाच भावंडे आहोत. आपल्या मुली सुशिक्षित आणि स्वावलंबी असाव्यात, अशी माझ्या आईचा नेहमीच इच्छा होती. आमच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तिने रात्रंदिवस शिवणकाम केले आहे.”
शिक्षण
आर्थिक अडचणी असूनही, श्रेया तिवारीने आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. तिने कानपूर येथील PSIT मधून बीसीए चे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर एमबीएल केले. शिक्षणाचा खर्च पेलणे कठीण असल्याने, विद्यार्थीदशेत असतानाच तिने इतरांना शिकवून पैसे कमवण्यास सुरुवात केली होती.
उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी असूनही श्रेयाला अपेक्षित असलेली करिअरची सुरुवात मात्र लगेचच मिळाली नाही. तिने सांगितले की, पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्याला ‘प्लेसमेंट’ मिळेल अशी आशा होती. परंतु काही नियमांमुळे तिला या प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी मिळाली नाही.
कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रगतीला मर्यादा
यामुळे काहीशी निराशा झाली असली, तरीही ती पुढे वाटचाल करत राहिली आणि नंतर टीसीएस मध्ये नोकरी मिळवली. नोकरी करत असतानाही तिने आपले पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि एमबीए पूर्ण केले. कालांतराने मात्र, कॉर्पोरेट क्षेत्रातील कार्यपद्धतीमुळे आपल्या प्रगतीवर मर्यादा येत आहेत, असे तिला जाणवू लागले.
श्रेयाने स्पष्ट केले, “माझे एमबीए पूर्ण केल्यानंतर, माझ्या लक्षात आले की कॉर्पोरेट क्षेत्रातील माझ्या प्रगतीला मर्यादा होत्या. तेव्हाच, एका स्थिर नोकरीचा त्याग करून, सोशल मीडिया, फ्रीलान्सिंग आणि उद्योजकतेविषयीच्या माझ्या आवडी पूर्ण करण्याचा कठीण निर्णय मी घेतला. आज, मी माझा स्वतःचा मार्ग घडवत आहे. मी कंटेंट क्रिएशन करत आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे आणि माझा स्वतःचा व्यवसाय चालवत आहे.”
२०२५ मध्ये, तिने आपली नोकरी सोडण्याचा आणि स्वतंत्र उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितले की, अगदी शून्यातून सुरुवात करणे म्हणजे कामाचा प्रत्येक भाग स्वतःच हाताळणे होय. जेव्हा तिने टीसीएस मध्ये कामाला सुरुवात केली होती, तेव्हा तिचे वार्षिक उत्पन्न सुमारे ४ लाख रुपये होते. आता ती सांगते की, तिचे एकूण उत्पन्न वर्षाला १४ लाख रुपयांच्या घरात पोहोचले आहे.

सध्याचे उत्पन्न आणि मासिक खर्च
आपल्या सध्याच्या उत्पन्नाचा तपशील देताना तिने सांगितले, “फ्रीलान्सिंगमधून वर्षाला अंदाजे ४,८०,००० रुपये, सोशल मीडियामधून वर्षाला अंदाजे ५,००,००० रुपये आणि कपड्याच्या व्यवसायातून (गेले ६ महिने) अंदाजे ४ लाख रुपये नफा मिळाला आहे.”
उत्पन्नात वाढ झाली असूनही, ती म्हणते की ती आपला खर्च नियंत्रणात ठेवते आणि व्यवसायाच्या वाढीवर लक्ष केंद्रित करते. या २५ वर्षीय तरुणीने सांगितले, “माझा सरासरी मासिक खर्च साधारणपणे २०,००० रुपये इतका आहे आणि उर्वरित रक्कम मी माझा व्यवसाय वाढवण्यासाठी गुंतवते.”
