Celebi Loss After India Ban: ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने तुर्कीयेची विमानतळ सेवा पुरवठादार कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द केल्याला जवळपास एक वर्ष उलटले आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या अध्यक्षा कॅनन सेलेबिओग्लू यांनी या घटनेचे वर्णन कंपनीच्या इतिहासातील सर्वात वेदनादायक प्रसंगांपैकी एक असे केले आहे.
अध्यक्ष कॅनन सेलेबिओग्लू यांनी याच्या परिणामांबद्दल बोलताना सांगितले की, सुमारे ४,२५० कोटी रुपयांचे व्यावसायिक मूल्य आणि १७ वर्षांची मेहनत “एका दिवसात” नाहीशी झाली.
ब्लूमबर्ग एचटीशी बोलताना सेलेबिओग्लू यांनी भारताच्या मे २०२५ मधील निर्णयाचे वर्णन कंपनीच्या इतिहासातील सर्वात वेदनादायक घटनांपैकी एक असे केले. त्यांनी सांगितले की, रातोरात हजारो कर्मचारी प्रतिस्पर्धी कंपन्यांकडे गेले आणि जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एका बाजारपेठेत (भारत) केलेली अनेक वर्षांची गुंतवणूक अक्षरशः वाया गेली.
“आमची सर्व उपकरणे आणि आमच्याकडील सर्व काही जप्त करण्यात आले आणि आम्हाला तिथून हटवण्यात आले. एकाच दिवसात त्यांनी आमच्या १०,००० कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कंपनीत हस्तांतरित केले. आम्ही निर्माण केलेले मूल्य जे कदाचित ४०० ते ५०० दशलक्ष डॉलर्स इतके होते, ते त्यांनी एका दिवसात शून्य करून टाकले”, असे सेलेबिओग्लू म्हणाल्या.
एका तुर्कीयेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द केल्याबाबत जाहीरपणे भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निर्णयामुळे कंपनीला दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबादसह भारतातील नऊ विमानतळांवरील ‘ग्राउंड-हँडलिंग’ आणि मालवाहतूक सेवा बंद करणे भाग पडले होते.
ऑपरेशन सिंदूरचे पडसाद
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष थांबवण्यास सहमती झाली. त्यानंतर पाच दिवसांनी, म्हणजेच १५ मे २०२५ रोजी भारताच्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने सेलेबीच्या भारतीय उपकंपन्यांची सुरक्षा मंजुरी रद्द केली.
एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम हल्ल्यास जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनांच्या तळावर हल्ले केले होते. पहलगाम हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना जबाबदार धरले, तर पाकिस्तानने यात आपला सहभाग असल्याचे नाकारले होते.
या संकटकाळात पाकिस्तानला तुर्कीयेने दिलेल्या पाठिंब्यामुळे भारत-तुर्कीये संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आणि तो एक मोठा वादाचा मुद्दा बनला होता. परिणामी भारताने सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द केली होती.
