मुंबई: जागतिक शेअर बाजारात एक मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रातील अभूतपूर्व तेजी आणि जगातील सर्वात मोठी चिपमेकर कंपनी ‘तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’मधील (टीएसएमसी) तुफानी घोडदौडीमुळे तैवानने एकूण बाजार भांडवलाच्या बाबतीत भारताला मागे टाकले आहे. ‘ब्लूमबर्ग’ने संकलित केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, तैवानच्या शेअर बाजार मूल्याने ४.९५ ट्रिलियन डॉलर (अंदाजे ४१५ लाख कोटी रुपये) टप्पा गाठला आहे, तर भारताचे बाजार मूल्य घसरून ४.९२ ट्रिलियनवर आले आहे.
या ऐतिहासिक भरारीमुळे तैवान आता अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँग यांच्यानंतर जगातील पाचवा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे. अमेरिकेच्या बाजाराचे भांडवल ७७.५३ ट्रिलियन डॉलर आहे. त्यापाठोपाठ चीनचे १५.६१ ट्रिलियन डॉलर, जपानचे ८.७० ट्रिलियन डॉलर तर हाँगकाँगचे ७. २५ ट्रिलियन डॉलर इतके आहे.
‘टीएसएमसी’चा एकहाती करिष्मा आणि एआयची लाट
तैवानच्या या यशामागे ‘टीएसएमसी’ या एकाच कंपनीचा सिंहाचा वाटा आहे. तैवानच्या मुख्य निर्देशांक म्हणजेच बेंचमार्क इंडेक्समध्ये एकट्या ‘टीएसएमसी’चा वाटा तब्बल ४२ टक्के इतका प्रचंड आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या एआय क्रांतीमध्ये लागणाऱ्या प्रगत सेमीकंडक्टरवर या कंपनीचे पूर्ण वर्चस्व आहे. परिणामी, चालू वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ४९ टक्क्यांची अफाट वाढ झाली आहे. एआय क्षेत्रातील या प्रचंड उत्साहामुळे तैवान आणि दक्षिण कोरियासारख्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब असलेल्या देशांना मोठा फायदा होत आहे.
नवीन नियमांचाही फायदा
फ्रँकलिन टेम्पलटनचे फंड मॅनेजर यी पिंग लियाओ यांनी सांगितले की, “तैवानचे वाढते बाजारभांडवल हे प्रामुख्याने त्यांच्या टेक हार्डवेअर क्षेत्रातील मक्तेदारीचे फळ आहे, जे सध्या जागतिक एआय गुंतवणूक चक्राच्या केंद्रस्थानी आहे. ज्या बाजारपेठांमध्ये टेक हार्डवेअरचा अभाव आहे, ते आता तैवान आणि कोरियासारख्या देशांच्या तुलनेत मागे पडत आहेत.”
याशिवाय, तैवानच्या वित्तीय नियामकांनी नुकतेच देशांतर्गत फंडांसाठी एकाच कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची मर्यादा वाढवली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फंड आता त्यांच्या एकूण मालमत्तेच्या २५ टक्क्यांपर्यंत हिस्सा ‘टीएसएमसी’सारख्या मोठ्या भारांकन असलेल्या कंपनीत गुंतवू शकतात, जे आधी फक्त १० टक्के होते. या नियमातील बदलामुळे तैवानच्या बाजारात ६ अब्ज डॉलरपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक येण्याची शक्यता जेपी मॉर्गन या जागतिक संस्थेने वर्तवली आहे.
भारतीय बाजारात घसरण का?
दुसरीकडे, भारतीय शेअर बाजाराला यावर्षी विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यात मुख्य कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ आहे. एआयमधील तेजीचा फायदा घेण्यासाठी जागतिक फंडांनी भारतामधून तब्बल २४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढून ती तैवान आणि कोरियाच्या बाजारात वळवली आहे. वाढती महागाई आणि महागडे शेअर्स: भारतातील शेअर्सचे वाढलेले मूल्यांकन, रुपयाची झालेली घसरण, ऊर्जेच्या वाढत्या किमती आणि कंपन्यांच्या नफ्यातील संथ वाढ यामुळे भारतीय बाजारावर दबाव आहे. या सर्व कारणांमुळे भारतीय बाजाराचा मुख्य निर्देशांक यावर्षी तब्बल ८ टक्क्यांनी घसरला असून, सलग १० वर्षे नफा कमावल्यानंतर यंदा पहिल्यांदाच वार्षिक घसरण नोंदवण्याच्या मार्गावर आहे. तसेच, ‘एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इंडेक्स’मधील भारताचे वजन गेल्या वर्षीच्या १९ टक्क्यांवरून घसरून आता १२ टक्क्यांवर आले आहे.
अर्थव्यवस्था म्हणून भारत अजूनही अग्रणी!
शेअर बाजाराच्या मूल्यात तैवानने जरी आघाडी घेतली असली, तरी मूळ अर्थव्यवस्थेच्या आकारमानात भारत अजूनही तैवानपेक्षा खूप पुढे आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, भारताची अर्थव्यवस्था ४.१५ ट्रिलियन डॉलर्सची असून ती जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. या तुलनेत तैवानचा एकूण जीडीपी हा केवळ ९७७ अब्ज डॉलर्स इतकाच आहे. म्हणजेच, भारताची अर्थव्यवस्था तैवानपेक्षा चौपट मोठी आहे, परंतु एआय क्षेत्रातील तात्पुरत्या तेजीमुळे तैवानच्या शेअर बाजाराचे मूल्य सध्या भारतापेक्षा अधिक वाढले आहे.
