Tata Group Dispute Darius Khambatta On Noel Tata, N Chandrasekaran And Tata Sons IPO: टाटा सन्सचा आयपीओ आणि अध्यक्ष म्हणून एन. चेंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीवरून टाटा समूहात सुरू असलेल्या संघार्षादरम्यान, वरिष्ठ वकील डेरियस जे. खंबाटा यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून पुन्हा नियुक्ती स्वीकारण्यास नकार दिला आहे. यावेळी त्यांनी विश्वस्तांचे स्वातंत्र्य, टाटा सन्सच्या आयपीओचा प्रस्ताव आणि टाटा समूहातील प्रशासकीय समस्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
खंबाटा यांनी २ नोव्हेंबर रोजी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले की, ते या दोन्ही ट्रस्ट्सच्या विश्वस्तपदी पुन्हा नियुक्ती व्हावी यासाठी ईच्छुक नाहीत. पण, नोएल टाटा आणि सिद्धार्थ शर्मा यांनी ते या पदावर कायम राहावेत अशी इच्छा व्यक्त केली होती.
खंबाटा यांनी सांगितले की, त्यांनी दिवंगत रतन टाटा यांच्या निमंत्रणावरून ही जबाबदारी स्वीकारली होती आणि विश्वस्त म्हणून आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची त्यांची इच्छा आहे.
स्वातंत्र्यासाठी किंमत मोजावी लागते
नोएल टाटा आणि शर्मा यांना लिहिलेल्या पत्रात खंबाटा म्हणाले, “या स्वातंत्र्यासाठी एक किंमत मोजावी लागते. माझी भूमिका आणि दृष्टिकोन अनेकदा इतरांपेक्षा वेगळे राहिले आहेत. यात नोएल टाटा यांचाही समावेश आहे. पण, नोएल टाटांना ज्या लोकशाहीवादी पद्धतीने हे स्वीकारले आहे, त्याचे मी कौतुक करतो. हीच टाटांची जुनी परंपरा आहे. मात्र, कायद्यानुसार, एखाद्या विश्वस्ताची पुनर्नियुक्ती करण्यासाठी इतर सर्व विश्वस्तांची संमती आवश्यक असते. अशी संमती मागणे माझ्या स्वभावात बसत नाही, कारण तसे केल्यास माझ्या स्वातंत्र्याशी तडजोड होईल.”
टाटा सन्सच्या आयपीओला विरोध करणारे पहिले व्यक्ती
“२८ मे २०२५ च्या बैठकीत टाटा सन्सच्या संभाव्य आयपीओबाबत सावध करणारा मी पहिला व्यक्ती होतो. मी तेव्हा असे म्हटले होते की, ही गोष्ट ट्रस्टच्या अस्तित्वासाठीच धोकादायक ठरू शकते. तसेच २८ जुलै २०२५ रोजी संमत झालेला ठराव मीच तयार केला आणि मांडला होता, ज्याला सर्वांची एकमताने संमती मिळाली. ट्रस्टच्या विश्वस्तांपैकी कोणीही यापेक्षा वेगळी भूमिका घेऊच शकले नसते, कारण प्रश्न ‘टाटा मॉडेल’च्या अस्तित्वाचा होता”, असे ते टाटा सन्सच्या आयपीओबाबत म्हणाले.
महात्त्मा गांधींचा सिद्धांत
“टाटा मॉडेल हे महात्मा गांधीजींच्या ‘ट्रस्टीशिप’ सिद्धांताचे जिवंत रूप आहे. हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित औद्योगिक आणि परोपकारी संस्थांचे एकत्रीकरण असून, ती एक राष्ट्रीय संपत्ती आहे, ज्यातील एक भाग दुसऱ्याशिवाय अर्थहीन आहे”, यांनी पत्रात पुढे म्हटले आहे.
महाभारताचा दाखला
आपल्या पत्राच्या शेवटी खंबाटा यांनी नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांच्यातील मतभेदांबाबतही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “नोएल आणि चंद्रा यांच्यात सध्या निर्माण झालेली दरी पाहून मला दुःख होत आहे. त्यांनी महाभारतातील भगवान श्रीकृष्णांचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत, ‘श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतात, सामान्य लोकही त्याचेच अनुकरण करतात. ते आपल्या उदाहरणातून जे निकष प्रस्थापित करतात, त्यांचेच जग अनुसरण करते.'”
