Tata Motors Car Price Hike impact on buyers: तुम्ही टाटाची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या खिशावर ताण आणणारी आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सने शुक्रवारी जाहीर केले आहे की, ते त्यांच्या पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत वाढ करत आहेत. येत्या १ सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू होणार असून, वेगवेगळ्या मॉडेलनुसार गाड्यांच्या किमतीत २५००० रुपयांपर्यंत वाढ केली जाणार आहे.
या दरवाढीमागचे कारण स्पष्ट करताना कंपनीने म्हटले आहे की, वाढलेला उत्पादन खर्च आणि महागाईचा सातत्याने असलेला ताण काही प्रमाणात भरून काढण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे होते. जरी या दरवाढीचा भार ग्राहकांवर पडणार असला, तरी याचा मोठा हिस्सा कंपनी स्वतः सोसत आहे आणि ग्राहकांवर पूर्ण भार टाकणे टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
उद्योग जगतासमोर मोठी आव्हाने
याविषयी बोलताना टाटा मोटर्स पीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश चंद्र यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “दुसऱ्या तिमाहीचा संपूर्ण उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. कच्च्या मालाच्या किमती ज्या प्रकारे वाढल्या आहेत, ते पाहता वर्षाची पहिली सहामाही अत्यंत आव्हानात्मक असणार आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, वाहन उद्योगात कच्च्या मालाचे भाव वाढले म्हणून लगेचच त्याचा बोजा ग्राहकांच्या माथी मारला जात नाही. सुरुवातीला कंपन्या अंतर्गत खर्च कमी करण्याचे सर्व मार्ग वापरतात. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावरच अत्यंत विचारपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने किमतीत वाढ केली जाते.
चालू वर्षातील तिसरी दरवाढ
विशेष म्हणजे २०२६ या वर्षात टाटा मोटर्सने केलेली ही तिसरी दरवाढ आहे. यापूर्वी कंपनीने १ जुलै २०२६ रोजी प्रवासी वाहनांच्या किमतीत १.५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. तर त्याआधी १ एप्रिल २०२६ रोजी केवळ पेट्रोल-डिझेल वाहनांच्या किमतीत ०.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.
ह्युंदाईनेही वाढवल्या किमती
केवळ टाटाच नव्हे तर काही दिवसांपूर्वीच ह्युंदाई मोटर इंडियानेही सप्टेंबरपासून त्यांच्या सर्व वाहनांच्या किमतीत १ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती. कच्च्या मालाचा वाढलेला खर्च, जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे ह्युंदाईने स्पष्ट केले होते. कंपन्या कितीही प्रयत्न करून खर्च स्वतः सोसण्याचा प्रयत्न करत असल्या, तरी वाढत्या दबावामुळे शेवटी दरवाढीचा निर्णय अटळ ठरत आहे.
