Tata Sons board meeting : टाटा सन्सची बहुप्रतिक्षित बोर्ड बैठक आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून ती १६ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या सूत्रांनुसार, ही बैठक वारंवार का पुढे ढकलली जात आहे, याचे कोणतेही अधिकृत कारण अद्याप देण्यात आलेले नाही. मात्र, आजची बैठक रद्द करण्यासाठी गुरुवारी (७ मे २०२६) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार देत बैठक रद्द करण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत अचानक बैठक रद्द केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

१६ मे ची बैठक इतकी महत्त्वाची का?

टाटा सन्सचे शेअर बाजारातील संभाव्य ‘लिस्टिंग’ आणि विश्वस्तांमधील अंतर्गत वाद या पार्श्वभूमीवर १६ मे रोजी होणारी बैठक अत्यंत कळीची ठरणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने टाटा सन्सच्या सार्वजनिक नोंदणीबाबत (IPO) आणि बोर्डावरील विश्वस्तांच्या प्रतिनिधित्वाबाबत सविस्तर चर्चा होणे अपेक्षित आहे.

टाटा सन्सच्या लिस्टिंगसाठी आरबीआयची डेडलाईन

टाटा सन्सला शेअर बाजारात सूचीबद्ध करणे हे आता केवळ अंतर्गत धोरण नसून ती एक नियामक गरज बनली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शॅडो बँकांसाठी नियम कडक केले आहेत. १ जुलैपासून टाटा सन्सला ‘सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट शॅडो बँक’ म्हणून नियुक्त केले जाईल, ज्यामुळे कंपनीला सार्वजनिकरित्या सूचीबद्ध करणे अनिवार्य होईल. आरबीआयने २०२२ मध्येच टाटा सन्सला “अप्पर-लेयर” एनबीएफसी म्हणून वर्गीकृत केले होते आणि तीन वर्षांत सार्वजनिक होण्याचे निर्देश दिले होते. यापूर्वी समूहाने कर्ज पुनर्रचना करून हे लिस्टिंग टाळण्याचा प्रयत्न केला होता.

विश्वस्तांमध्ये ‘दोन गट’?

टाटा सन्सच्या लिस्टिंगबाबत विश्वस्तांमध्ये मतभेद असल्याचे समोर येत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, टाटा समूहाचे अध्यक्ष नोएल टाटा हे टाटा सन्सच्या लिस्टिंगच्या विरोधात आहेत. याउलट, वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग हे कंपनीने सूचीबद्ध होण्याच्या दिशेने पाऊल टाकावे, यासाठी आग्रही असल्याची शक्यता आहे.

मेहली मिस्त्रींचा आक्रमक पवित्रा

माजी विश्वस्त मेहली मिस्त्री यांनी वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांच्या ‘टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट’ मधील फेरनियुक्तीला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी टाटा ट्रस्टचे सीईओ सिद्धार्थ शर्मा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, “वेणू आणि विजय यांच्या फेरनियुक्तीला विरोध करण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता. माझ्या विरोधात ज्या पद्धतीने मतदान करण्यात आले, त्या संदर्भातील सर्व कारणे मी माझ्या शपथपत्रात स्पष्ट केली आहेत.” मिस्त्री यांनी या पत्राद्वारे इतर विश्वस्तांनी नक्की कसे मतदान केले, याची माहिती देखील जाहीर करण्याची मागणी केली आहे.