Tata Sons IPO Conflict insights highlight Noel Tata Vs Chandrasekaran: टाटा समूह हा देशातील सर्वात जुना उद्योग समूह आहे. १५० वर्षांचा इतिहास असलेल्या या समूहामध्ये सध्या मोठा अंतर्गत संघर्ष सुरू आहे. या संघर्षामागे टाटा समूहाची पालक कंपनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन यांची झालेली फेरनियुक्ती आणि टाटा सन्सच्या आयपीओला टाटा ट्रस्टचे प्रमुख नोएल टाटा यांचा असलेला विरोध, ही दोन प्रमुख कारणे आहेत.
नोएल टाटा यांना अशी चिंता आहे की, जर टाटा सन्सचा आयपीओ आणला तर यामुळे टाटा समूहातील अडचणीत आलेल्या इतर कंपन्यांना मदत करण्याच्या टाटा सन्सच्या क्षमतेवर परिणाम होईल. या कारणांमुळे आता गेल्या १५० वर्षांपासून टाटा समूहाच्या यशाचा आधार राहिलेल्या बिझनेस मॉडेलमध्ये बदल घडू शकतो.
नोएल टाटा आपल्याला क्वचितच माध्यमांशी बोलताना पाहायला मिळतात. पण, त्यांनी काल रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले आहे. टाटा सन्सची ६६ टक्के मालकी असलेल्या ट्रस्ट्सचे प्रमुख असलेल्या नोएल टाटा यांनी स्पष्ट केले की, अडचणींचा सामना करणाऱ्या समूहातील इतर कंपन्यांसाठी ही होल्डिंग कंपनी कित्येक दशकांपासून आर्थिक आधारस्तंभ म्हणून काम करत आली आहे.
“बँका, कर्ज देणाऱ्या संस्था, भागधारक आणि पुरवठादार यांना या गोष्टीमुळे नेहमीच दिलासा मिळाला आहे”, असे ते म्हणाले.
“आता चिंतेची बाब म्हणजे, जेव्हा वैयक्तिक भागधारक असतात, तेव्हा ते याला मान्यता देतील का आणि कठीण परिस्थितीतून जात असलेल्या कंपन्यांमध्ये आम्हाला गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यास ते तयार असतील का? आमच्या मते, या गोष्टींमुळे गेल्या १५० वर्षांपासून हा समूह ज्या पद्धतीने चालवला जात आहे, त्यातील मूलभूत कार्यपद्धतीच बदलून जाईल”, असे नोएल टाटा म्हणाले.
नोएल टाटांचा टाटा सन्सच्या आयपीओला विरोध का?
१७ सप्टेंबर रोजी टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत संचालक मंडळाने नोएल टाटा यांचा विरोध डावलून टाटा सन्सचा आयपीओ आणि एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी आणखी पाच वर्षांसाठी फेरनियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे समूहाची प्रशासन, व्यवस्थापन आणि त्याच्या होल्डिंग कंपनीचे भवितव्य यांबाबतचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
नोएल टाटा यांनी असेही म्हटले की, आयपीओमुळ टाटा सन्सच्या समाजसेवेच्या उद्दिष्टांवर परिणाम होऊ शकतो. या होल्डिंग कंपनीची ६६ टक्के मालकी धर्मादाय ट्रस्ट्सकडे आहे, ज्यामुळे कंपनीची मालकी रचना समूहाच्या परोपकारी कार्यांशी संबंधित आहे. “मला आशा आहे की आरबीआय या विषयावर आमच्याशी चर्चा करेल आणि आम्हाला काहीतरी सुवर्णमध्य साधता येईल”, असे नोएल टाटा म्हणाले.
