Ratan Tata Opposition Tata Sons IPO: टाटा समूहाची पालक कंपनी टाटा सन्सच्या आयपीओसाठी कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. मात्र, या आयपीओला टाटा सन्समध्ये सर्वाधिक हिस्सेदारी असलेल्या टाटा ट्रस्ट्सचे प्रमुख नोएल टाटा यांनी विरोध केला आहे. याचबरोबर एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्याच्या निर्णयालाही नोएल टाटा यांचा विरोध आहे. यामुळे १५८ वर्षे जुन्या उद्योग समूहात मोठा अंतर्गत संघर्ष सुरू आहे.
दरम्यान टाटा सन्सचा आपीयपीओ आणण्याची कल्पना नवी नाही. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला रतन टाटा हे टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टचे प्रमुख असताना यावर अंतर्गत चर्चा झाली होती. परंतु ती चर्चा केवळ चर्चाच राहिली.
माजी आएएस अधिकारी आणि रतन टाटांचे अधिकृत चरित्रकार थॉमस मॅथ्यू यांनी त्यांच्या ‘रतन टाटा: अ लाईफ’ या पुस्तकात लिहिले आहे की, टीसीएसच्या आयपीओ दरम्यान टाटा सन्सच्या आयपीओचीही चर्चा सुरू झाली होती. टीसीएस ऑगस्ट २००४ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाली.
“अनेकांनी रतन यांना टाटा सन्सला सार्वजनिक कंपनी बनवण्याचा सल्ला दिला होता”, असे टाटा सन्सचे वित्त संचालक राहिलेल्या इशात हुसेन यांनी मॅथ्यू यांना सांगितले. हे प्रत्यक्षात यावे या आशेने, रतन टाटा यांच्यामागे गुंतवणूकदार बँकर्स मागे लागले होते, यासाठी त्यांनी विविध आकर्षक योजना तयार केल्या होत्या.
रतन टाटांना का नको होता आयपीओ?
हे पुस्तक लिहिताना मॅथ्यू यांनी रतन टाटा यांची अनेकदा भेट घेतली होती. रतन टाटा स्वतःही टाटा सन्सला शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याच्या बाजूने नव्हते, असे मॅथ्यू यांनी सांगितल्याचे बिझनेस टुडेच्या वृत्तात उल्लेख आहे.
“रतन टाटा हे एक्सट्रोव्हर्ट नव्हते. अनेकदा ते एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा न करता आपला निर्णय स्पष्ट करत असत. टाटा सन्सच्या लिस्टिंगच्या बाबतीतही त्यांनी असेच केले. त्यांनी हा विषय पूर्णपणे दाबून टाकला”, असे मॅथ्यू यांनी बिझनेस टुडे संकेतस्थळाला सांगितले.
ते पुढे म्हणाले, “रतन टाटा यांनी अनेक प्रसंगी मला आयपीओबाबतच्या आपल्या भीतीबद्दल सांगितले होते. त्यांना वाटायचे की, आयपीओमुळे टाटा समूहाचे समाजसेवी मॉडेल नष्ट होईल. त्यांचे असे मत होते की, जर टाटा सन्स सूचीबद्ध झाली, तर टाटा समूहाचे लक्ष समाजकार्याकडून त्रैमासिक नफ्याकडे वळेल आणि सामाजिक कल्याण हे या समूहाचे मुख्य उद्दिष्ट राहणार नाही.”
