Tata Sons Secret Meeting Noel Tata and N Chandrasekaran conflict: देशातील सर्वात प्रतिष्ठीत आणि १५० वर्षांचा इतिहास असलेल्या टाटा समूहात सध्या पालक कंपनी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची फेरनियुक्ती आणि टाटा सन्सचा आयापीओ याला टाटा ट्र्स्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांचा विरोध आहे. यामुळे टाटा समूहात सध्या अंतर्गत संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष मिटावा या उद्देशाने टाटा समूहातील ज्येष्ठ व्यक्ती एन. ए. सुनावाला यांनी एन. चंद्रशेखरन आणि नोएल टाटा यांच्यात २५ ऑक्टोबर रोजी एक गुप्त बैठक आयोजित केली होती. याबाबात ईकॉनॉमिक टाईम्सने वृत्त दिले आहे.

दरम्यान एन. चंद्रशेखरन आणि नोएल टाटा यांच्यातील ही बैठक कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली, असे या प्रकरणाची माहिती असलेल्या व्यक्तींनी सांगितले. या बैठकीत प्रामुख्याने टाटा समूहातील पालक कंपनी टाटा सन्सचा आयपीओ, शापूरजी पालनजी समूहाची टाटा सन्स मधील हिस्सेदारी विकत घेण्याचा प्रस्ताव आणि चंद्रशेखरन यांचा अध्यक्ष म्हणून वाढवलेला कार्यकाळ यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

टाटा समूहातील माजी अधिकाऱ्यांना चिंता

टाटा समूहातील या अंतर्गत संघर्षामुळे ब्रँडवर होणाऱ्या परिणामांबद्दलच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहाचे माजी अधिकारी आणि काही अंतर्गत सूत्रांच्या हस्तक्षेपानंतर रविवारी ही बैठक झाली, अशी माहिती सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्याचा उल्लेख ईकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तात आहे.

टाटा सन्सच्या १७ सप्टेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांमधील ही पहिलीच बैठक होती. त्या बैठकीत एन. चंद्रशेखरन यांची फेनियुक्ती टाटा सन्सच्या आयपीओला मंजुरी देण्यात आली होती.

गुप्त बैठकीसाठी कोणाचे प्रयत्न?

या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, एस. रामादोराई, इशात हुसेन आणि आर. गोपालकृष्णन यांसारख्या समूहातील जुन्या जाणत्या व्यक्तींनी, तसेच नोएल टाटा यांच्या पत्नी आलू टाटा आणि किर्लोस्कर सिस्टम्सच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक गीतांजली किर्लोस्कर यांसारख्या अंतर्गत व्यक्तींनी या गुप्त बैठकीसाठी प्रयत्न केले.

नोएल टाटा यांच्या पत्नी आलू टाटा या शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष शापूर मिस्त्री यांच्या भगिनी आहेत. तर, नोएल टाटा यांचे सुपुत्र नेव्हिल यांचा विवाह गीतांजली किर्लोस्कर यांची कन्या मानसी यांच्याशी झाला आहे.

कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?

कायदेतज्ज्ञांच्या मते, वाद सोडवण्यासाठी संवाद हा एक मार्ग असू शकतो. मात्र, कायद्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते.

कॅपस्टोन लीगलचे व्यवस्थापकीय भागीदार आशिष के. सिंग म्हणाले, “परस्पर चर्चा आणि समेटाद्वारे वाद मिटवणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. ज्या प्रकरणांमध्ये अनेक भागधारक असतात आणि जी कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या तत्त्वांशी सुसंगत असतात, अशा प्रकरणांमध्ये न्यायालयेही वादांचे सामंजस्यपूर्ण निराकरण करण्यास प्रोत्साहन देतात.” याबाबतही इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तात उल्लेख आहे.