Tata Sons N Chandrasekaran Venu Srinivasan: देशातील सर्वा जुना आणि १५० वर्षांचा इतिहास असलेल्या टाटा समूहामध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद आणि आयपीओवरून जोरदार संघर्ष सुरू आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाने नुकतेच एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी फेरनियुक्ती केली आहे. यामध्ये टीव्हीएस मोटार्सचे प्रमुख आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त वेणू श्रीनिवासन यांनी एन. चंद्रशेखरन यांच्या बाजूने मतदान केले होते.

या पार्श्वभूमीवर वेणू श्रीनिवासन आणि एन. चंद्रशेखरन चर्चेत असताना, त्यांच्याबाबतची एक मोठी घडामोड समोर आली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या कुटुंबाच्या मालकीची एक कंपनी कर्नाटक येथे ३३० कोटी रुपयांचा इंडस्ट्रियल पार्क उभारण्याच्या तयारीत आहे. हा प्रकल्प वाहन उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीच्यागरजा पूर्ण करण्यासाठी असेल. या दुचाकी उत्पादक कंपनीशी संबंधित हा त्यांचा दुसरा प्रकल्प आहे.

नोव्हेंबर २०२५ मध्ये चंद्रशेखरन यांच्या पत्नी ललिता आणि मुलगा प्रणव यांच्या मालकीच्या हॅनो वन वेअरहाउसिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कर्नाटकातील इम्मावू औद्योगिक क्षेत्रात ३५ एकर जमिनीसाठी कर्नाटकच्या जमीन लेखापरीक्षण समितीकडे प्रस्ताव सादर केला.

या बैठकीच्या इतिवृत्तानुसार, हा प्रकल्प टीव्हीएस मोटर्स आणि त्यांचे टियर-१ पुरवठादार यांच्यासाठी वाहनाचे सुटे भाग निर्मिती आणि पुरवठा करणारी औद्योगिक वसाहत म्हणून विकसित केला जाणार आहे. हॅनोच्या ताज्या आर्थिक विवरणपत्रांनुसार, औद्योगिक जमिनीची खरेदी आणि विकास करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाने कंपनीला सुमारे २७ कोटी रुपयांना जमीन मंजूर केली आहे. यापैकी ७.९१ कोटी रुपयांची रक्कम कंपनीने २०२५-२६ या आर्थिक वर्षात भरली आहे. याबाबत मिंट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तात उल्लेख आहे.

टाटा सन्सला व्यवहाराची कल्पना नाही

चंद्रशेखरन किंवा श्रीनिवासन या दोघांनीही टाटा सन्सच्या संचालक मंडळाला या व्यावसायिक संबंधांची माहिती दिलेली नाही. टाटा सन्सने यापूर्वी सांगितले होते की व्यवहार त्यांच्या संचालक मंडळासमोर ठेवण्याची गरज नाही. श्रीनिवासन टाटा सन्सच्या संचालक मंडळावर टाटा ट्रस्टचे नामनिर्देशित आणि चंद्रशेखरन यांच्या कामगिरीचे आणि वेतनाचे मूल्यमापन करणाऱ्या नामनिर्देशन आणि मोबदला समितीचे सदस्य आहेत. त्यांनी देखील टाटा सन्स किंवा टाटा ट्रस्टना याची माहिती दिली नसल्याचे टाटा ट्रस्ट्सने आधीच स्पष्ट केले आहे.

टाटा समूहाची आचारसंहिता काय म्हणते?

टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्सना या व्यावसायिक संबंधांची माहिती न दिल्यामुळे हा हितसंबंधांचा संघर्ष आणि टाटा आचारसंहितेचा भंग आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. टाटा समूहाची आचारसंहिता म्हणते की जेव्हा एखादा कर्मचारी एखाद्या कराराबद्दल निर्णय घेऊन किंवा प्रभावित करून “स्वतःसाठी, कुटुंबातील सदस्यासाठी किंवा जवळच्या व्यक्तीसाठी अन्यायकारक लाभ मिळवू शकतो” तेव्हा संघर्ष उद्भवतो आणि त्यासाठी कार्यकारी संचालकांनी मंडळाला वास्तविक किंवा संभाव्य संघर्ष उघड करणे आवश्यक असते.