Tata Sons Noel Tata Suspension Demand Charity Commissioner Complaint: टाटा समूहाची पालक कंपनी टाटा सन्समध्ये सध्या अंतर्गत संघर्ष सुरू आहे. टाटा सन्सचे सर्वात मोठे भागधारक असलेल्या सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या कारभाराविरोधात विश्वस्त वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह यांनी महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती. यावर आता महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी सर दोराबजी टाटा ट्रस्ट संबंधित तक्रारींवर उत्तर देण्यास सांगितले आहे. या दोघांनी ट्रस्टच्या व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्समधील संघार्षाबाबात माहिती असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धर्मादाय आयुक्तांनी सोमवारी सर दोराबजी टाटा ट्रस्टला तक्रारींच्या प्रतींसह एक पत्र पाठवून १२ ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. या तक्रारी टीव्हीएस मोटर कंपनीचे ‘चेअरमन एमेरिटस’ श्रीनिवासन आणि संरक्षण विभागाचे माजी सचिव सिंग यांनी दाखल केल्या होत्या. याबाबत मिंट संकेतस्थळाने वृत्त दिले आहे.

विश्वस्त वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह यांनी २५ सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या तक्रारींमध्ये आरोप केला की, “टाटा सन्सच्या व्यावसायिक कामकाजात सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या थेट सहभागामुळे ट्रस्टच्या धर्मादाय दर्जाला धोका निर्माण झाला आहे.” तसेच, “नामनिर्देशित संचालकांच्या स्वतंत्र निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप” केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या तक्रारींमध्ये वेणू श्रीनिवासन यांनी धर्मादाय आयुक्तांना आवाहन केले आहे की, तपासात उघडकीस येणाऱ्या गैरप्रकारांवर कारवाई करावी. या कारवाईमध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांना निलंबित करणे किंवा पदावरून दूर करणे यांचा समावेश आहे.

टाटा समूहात कशामुळे वाद?

देशातील आघाडीचा आणि १५० वर्ष जुना असलेला टाटा समूहात सध्या त्यांची पालक कंपनी टाटा सन्सचा आयपीओ आणि अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची फेरनियुक्ती यावरून संघर्ष सुरू आहे. १७ सप्टेंबर रोजी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी तिसऱ्या कार्यकाळासाठी फेरनियुक्ती करण्यास विरोध दर्शविला होता. तर कंपनीच्या आयपीओची आवश्यकता लक्षात घेता संचालक मंडळातील इतर सदस्यांनी चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखालील कामकाज सुरू ठेवण्याला पाठिंबा दिला.

सरकार हस्तक्षेप करणार नाही

टाटा समूहात सुरू असलेल्या संघर्षावरून केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार का? अशी चर्चा सध्या देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रात सुरू आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सरकार यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही. पण, टाटा समूहातील सर्व घडामोडींवर सरकार लक्ष ठेऊन आहे. याबाबत फायनान्शिअल एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.