Tata Sons Restructuring Sir Dorabji Tata Trust Dispute: टाटा ट्रस्ट्सने प्रस्तावित केलेल्या टाटा सन्सच्या पुनर्रचनेमुळे ट्रस्ट्समध्ये नवे मतभेद निर्माण झाले आहेत. ट्रस्टच्या सर्व सदस्यांशी चर्चा न करताच टाटा सन्सच्या पुनर्रचनेचा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न दोन वरिष्ठ विश्वस्तांनी उपस्थित केला आहे.
सर दोराबजी टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि विश्वस्त असलेल्या वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह यांनी ट्रस्टच्या इतर विश्वस्तांना पत्र लिहून टाटा ट्रस्ट्सच्या २८ सप्टेंबर रोजीच्या बैठकीवर आक्षेप नोंदवला आहे. या बैठकीत टाटा इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम्स सोल्युशन्स आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स यांचे टाटा सन्समध्ये विलीनीकरण करण्यासह एका धोरणात्मक पुनर्रचनेसाठी टाटा सन्सच्या मंडळाची मंजुरी मागण्यात आली होती.
श्रीनिवासन आणि सिंह यांनी म्हटले आहे की, प्रस्तावित पुनर्रचनेमुळे टाटा सन्स, सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि इतर भागधारकांसाठी गंभीर आर्थिक परिणाम उद्भवू शकतात. “यात विलीनीकरण आणि टाटा सन्सच्या नियामक दर्जातील बदलामुळे प्रभावित होणाऱ्या समूहातील कंपन्या, कर्मचारी आणि नियामक संस्थांचा समावेश आहे”, असे त्यांनी लिहिले.
विविध नियमांचे “उल्लंघन” केल्याप्रकरणी सर दोराबजी टाटा ट्रस्ट विरुद्ध कारवाई करण्यासाठी श्रीनिवासन आणि विजय सिंह या दोघांनीही या आठवड्याच्या सुरुवातीला धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहिले होते.
या दोन्ही विश्वस्तांनी सांगितले की, “सार्वजनिक स्रोतांकडून” या प्रस्तावाबद्दल आणि त्यासोबतच्या जाहीर घोषणेबद्दल समजल्यावर त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी असा आरोप केला की, सर दोराबजी टाटा ट्रस्टची कोणतीही बैठक झाली नव्हती आणि ट्रस्टच्या नावाने ही सूचना जारी करण्यापूर्वी त्यांचा सल्लाही घेण्यात आला नव्हता.
तसेच ज्या पद्धतीने या प्रस्तावाद्वारे टाटा सन्सच्या मंडळाला पुनर्रचनेचा “विचार करून ती मंजूर” करण्यास सांगितले जात आहे, त्या पद्धतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचा असा युक्तिवाद आहे की, कायदेशीर, नियामक, आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या इतके महत्त्वपूर्ण असलेल्या निर्णयाचे कंपनीच्या संचालक मंडळाने स्वतंत्रपणे मूल्यमापन केले पाहिजे.
“आमच्या माहितीनुसार, टाटा सन्सला पत्र पाठवण्यापूर्वी या विषयावर चर्चा करण्यासाठी किंवा विचारविनिमय करण्यासाठी सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांची कोणतीही बैठक घेण्यात आली नाही. आमचा सल्ला घेण्यात आला नाही आणि इतर विश्वस्तांचाही सल्ला घेण्यात आला होता याची आम्हाला माहिती नाही. त्यामुळे हे स्पष्ट नाही की हे पत्र आणि त्याद्वारे मांडलेल्या प्रस्तावाला सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांचा पाठिंबा आहे की नाही”, असे वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह यांनी पत्रात म्हटले आहे.
