TCS Business Impact Amidst Tata Sons Leadership Struggle: टाटा समूहात टाटा सन्सचा आयपीओ आणि अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची फेरनियुक्ती यावरून अंतर्गत संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष आता न्यायालयापर्यंत जाण्याची शक्यता अनेकजन वर्तवत आहेत. यामुळे टाटा समूहातील कंपन्यांच्या व्यवसायावर याचा काय परिणाम होईल अशा चर्चा सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर टीसीएसच्या कार्यकारी संचालक, अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सुब्रमण्यन यांनी स्पष्ट केले की, टाटा समूहातील नेतृत्वाच्या पातळीवरील संघर्षाबाबत ग्राहकांकडून कोणताही प्रश्न उपस्थित केला गेला नाही. त्यांनी नमूद केले की, त्यांनी अनेक ग्राहकांची भेट घेतली आहे, परंतु टाटा समूहातील या सत्तासंघर्षाबाबत ग्राहकांकडून कोणतीही चिंता व्यक्त करण्यात आलेली नाही.

बिझनेस स्टँडर्डला दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यन म्हणाल्या, “याचा व्यवसायावर अजिबात परिणाम झालेला नाही आणि ग्राहकांकडूनही कोणतेही प्रश्न विचारले गेलेले नाहीत. विशेषतः या तिमाहीत, टीसीएसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक के. कृथिवसन आणि मी अनेक ग्राहकांना भेटलो आहोत, तसेच अनेक ग्राहक आम्हाला भेटण्यासाठी येथे आले होते. यापैकी कोणीही याबाबत कोणताही प्रश्न किंवा चिंता उपस्थित केली नाही.”

टाटा समूहामध्ये नेतृत्व आणि नियंत्रणावरून संचालक मंडळात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आरती सुब्रमण्यन यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा आहेत.

या संघर्षामुळे समूहाच्या मालकी रचनेतील तणाव उघड झाला आहे. टाटा ट्रस्ट्सकडे सूचीबद्ध नसलेली पालक कंपनी, टाटा सन्सची ६६% मालकी आहे, परंतु संचालक मंडळावरील त्यांचे प्रतिनिधित्व एकूण सदस्यसंख्येच्या केवळ एक-तृतीयांश इतके मर्यादित आहे. यामुळे, बहुसंख्य भागधारकाच्या भूमिकेला संचालक मंडळ डावलू शकते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टाटा ट्रस्ट्समध्ये मतभेद

नोएल टाटा आणि टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन हे टाटा ट्रस्ट्सचे प्रतिनिधी आहेत, परंतु महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्या आहेत. सायरस मिस्त्री यांना पदावरून हटवल्यानंतर २०१७ मध्ये सूत्रे हाती घेणाऱ्या चंद्रशेखरन यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याच्या बाजूने नोएल टाटा नाहीत. याउलट, श्रीनिवासन यांनी चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीचे समर्थन केले आहे.

टाटा सन्सचा प्रस्तावित आयपीओ देखील मतभेदाचा मुद्दा बनला आहे. नोएल टाटा यांनी आयपीओला जाहीरपणे विरोध केला आहे, तर आधी विरोध करणारे वेणू श्रीनिवासन आता त्याचे समर्थन करत आहेत.