TCS vs Microsoft Work Culture viral post: शैलेश गुरुंग नावाच्या एका नोकरदाराने इन्स्टाग्रावर आपला कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभव शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आपला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि मायक्रोसॉफ्टमधील कामाच्या अनुभवावर भाष्य केले आहे. या कॉर्पोरेट संस्कृती, कामाच्या ठिकाणी लवचिकता आणि व्यावसायिक जबाबदारी यांचा समावेश आहे.

पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर टीसीएसमध्ये फ्रेशर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या गुरुंग यांनी सांगितले की, तेथील कामाच्या शिस्तबद्ध वातावरणामुळेच कॉर्पोरेट जीवनाबद्दलची त्यांची सुरुवातीची समज मोठ्या प्रमाणात तयार झाली.

“मी पदवीच्या शिक्षणानंतर लगेचच फ्रेशर म्हणून टीसीएसमध्ये रुजू झालो, त्यामुळे कॉर्पोरेट जीवनाबद्दलची माझी कल्पना लॉग इन करा, काम करा आणि लॉग आउट करा अशी होती” असे गुरुंग यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.

मात्र, मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्यानंतर आपला अनुभव बदलल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही कंपन्यांमधील आपल्या कामाचा आढावा घेताना, गुरुंग यांनी त्यांना जाणवलेल्या अनेक फरकांवर भाष्य केले आहे.

“मायक्रोसॉफ्टमध्ये तुम्ही कोणाशीही संपर्क साधू शकता, सर्वांशी मिळून काम करू शकता आणि तुमचे म्हणणे ऐकले जाते”, असे त्यांनी म्हटले आहे.

गुरुंग यांनी सांगितले की, मायक्रोसॉफ्टमधील वातावरणामुळेही त्यांना अनेक गोष्टींचे आश्चर्य वाटले. त्यांनी हॅकाथॉन्स, विविध टीम्समधील संयुक्त स्पर्धा, गेमिंग झोन्स आणि कर्मचाऱ्यांना निवांत वेळ घालवता येईल व ताजेतवाने राहता येईल अशा जागांचा विशेष उल्लेख केला.

तसेच, कर्मचारी आपल्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना मायक्रोसॉफ्टच्या कॅम्पसमध्ये बोलावू शकतात, तिथे एकत्र वेळ घालवू शकतात आणि कॅम्पसध्येच जेवणही करू शकतात. हा अनुभव त्यांना त्यांच्या पूर्वीच्या कंपनीत कधीच आला नव्हता, असेही त्यांनी नमूद केले.

View this post on Instagram

A post shared by Sailesh Gurung | Tech, Lifestyle (@saileshgurung97)

केवळ कर्मचारी नव्हे माणूस

गुरुंग यांनी कामाच्या ठिकाणच्या अशा काही छोट्या-मोठ्या सोयीसुविधांचाही उल्लेख केला आहे. यामध्ये दर्जेदार अन्न आणि कॉफी, चांगल्या सुविधा, मसाज चेअर्स आणि विश्रांतीसाठी स्वतंत्र जागा यांचा समावेश होता. “हे कामाचे ठिकाण केवळ कर्मचाऱ्यांसाठी नाही, तर मानवांसाठीच तयार केल्यासारखे वाटते”, असे त्यांनी लिहिले.

हे १०० टक्के खरे

शैलेश गुरंग यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हे १०० टक्के खरे आहे. मी १० वर्षांहून अधिक काळापासून मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत आहे आणि तिथली कार्यसंस्कृती सर्वोत्तम आहे”, असे एक युजर म्हणाला.