Guide on early age investment strategies for the modern youth: गुंतवणुकीविषयी अलिकडील पिढी मोठ्या प्रमाणात साक्षर झाली आहे. चार्ल्स श्वाबच्या आकडेवारीनुसार, १३ ते १७ वयोगटातील १० पैकी ७ किशोरवयीन मुले म्हणतात की त्यांना गुंतवणुकीत खूप रस आहे. त्यांचे पालकही यासाठी पूर्णपणे तयार आहेत. जवळपास तीन-चतुर्थांश पालकांचे म्हणणे आहे की किशोरवयीन मुलांनी गुंतवणुकीबद्दल शिकणे खूप महत्त्वाचे आहे.

“आजची तरुण पिढी अशा वातावरणात मोठी होत आहे जिथे गुंतवणुकीविषयक माहिती सर्वत्र उपलब्ध आहे, पण ती नेहमीच विश्वासार्ह असते असे नाही”, असे चार्ल्स श्वाबचे व्यवस्थापकीय संचालक मायकेला जेसियोनोव्स्की यांनी सांगितल्याचे याहू फायनान्सच्या स्तंभलेखिका केरी हॅनन यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

“असा खूप सारे मेसेजेस किंवा प्रचार पाहायला मिळतात ज्यात दीर्घकालीन संपत्ती निर्मितीऐवजी झटपट श्रीमंत होण्यावर भर दिला जातो. तसेच, गुंतवणूक आणि जुगार यांमधील रेषा पुसट झाल्याचेही आपल्या निदर्शनास आले आहे. म्हणूनच, तरुणांना गुंतवणुकीच्या अशा मूलभूत तत्त्वांची पक्की समज देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जी त्यांच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांना पूरक ठरतील”, असे मायकेला जेसियोनोव्स्की म्हणाल्याचा उल्लेख हॅनन यांच्या लेखात आहे.

यासाठी हीच योग्य वेळ आहे, कारण केवळ १४% लोकांनाच गुंतवणुकीबद्दल बरीच माहिती असल्याचे वाटते. त्यांना चुकीच्या गुंतवणुकीमुळे पैसे गमावण्याची भीती वाटते, तसेच गुंतवणूक करताना नेमके काय करावे हे न समजणे आणि गुंतवणुकीच्या कामगिरीबाबत तणाव जाणवणे या गोष्टींचीही त्यांना चिंता वाटते.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्या किशोरवयीन मुलांचे असे मत आहे की, गुंतवणुकीतून पैसे कमवण्यासाठी नशिबापेक्षा कौशल्याची अधिक गरज असते. तरीही, तितक्याच संख्येने मुलांनी असेही म्हटले आहे की गुंतवणूक करणे हा मनोरंजनाचा एक चांगला मार्ग आहे.

आर्थिक नियोजनाचे व्यासपीठ असलेल्या ‘ट्राउटवुड’चे संस्थापक जीन नताली म्हणाले, “उन्हाळ्याच्या सुट्टीत मिळणाऱ्या पहिल्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनच बचत आणि गुंतवणुकीची सवय लावून घेणे आवश्यक आहे. पेन्शनची सुविधा नसलेल्या आजच्या जगात, आपल्या आर्थिक भविष्याची संपूर्ण जबाबदारी आपली स्वतःची आहे. हे ज्ञान केवळ ‘असल्यास चांगले’ अशा स्वरूपाचे राहिलेले नाही, तर ते अत्यंत आवश्यक बनले आहे.”

सोशल मीडिया आणि श्रीमंती

“माझ्या मते, कमी वयात गुंतवणूक सुरू करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे केवळ वेळ. १५ किंवा १६ वर्षांचा एखादा किशोरवयीन मुलगा, जो चक्रवाढ व्याज आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या सवयी समजून घेतो, तो अनेक प्रौढांपेक्षा खूप पुढे असतो”, असे वेक फॉरेस्ट युनिव्हर्सिटीतील गुंतवणूक आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन फेलो मार्क जॉन्सन म्हणाले.

पण अर्थातच, काही मर्यादा महत्त्वाच्या आहेत, असेही ते पुढे म्हणाले. “सोशल मीडियामुळे गुंतवणूक करणे अधिक सुलभ झाले आहे, पण त्याचबरोबर सट्टेबाजी आणि ‘लवकर श्रीमंत होण्याचा’ विचारही खूप सामान्य झाला आहे”, असे जॉन्सन म्हणाले.