Rafael Nadal Business And Net Worth: ‘लाल मातीचा अनभिषिक्त सम्राट’ म्हणून ओळख असलेला माजी टेनिसपटू राफेल नदालला निवृत्तीनंतरचे आयुष्य एखाद्या सामान्य निवृत्त व्यक्तीसारखे जगायचे नाही. बहुतांश लोकांसाठी, बँकेत कोट्यवधींची संपत्ती असताना निवृत्त होणे म्हणजे आयुष्यभर आरामात आणि निवांतपणे जगण्याचे स्वप्न असते. पण नदालच्या बाबतीत मात्र तसे नाही.

दोन दशकांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस खेळल्यानंतर, नोव्हेंबर २०२४ मध्ये नदालने आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीची सांगता केली. या कारकिर्दीत त्याने २२ ग्रँड स्लॅम जेतेपदे आणि २०९ आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान राहिला, तसेच २२० दशलक्ष डॉलर्सची संपत्तीही कमावली. ज्या किंमत भारतीय रुपयांत सुमारे १८०० कोटी रुपये इतकी होते. मात्र, निवृत्तीनंतर केवळ आराम आणि मौजमजा करण्याऐवजी, नदाल आता हॉटेल व्यवसायाचे साम्राज्य उभारण्यात व्यस्त आहे.

“मी असा व्यक्ती नाही ज्याला सकाळी उठल्यावर काय करावे असा प्रश्न पडतो. पण मला काम करायला आवडते. ज्याप्रमाणे मी टेनिस कोर्टवर माझा वारसा निर्माण केला, त्याचप्रमाणे आता कोर्टबाहेरही माझा वारसा निर्माण करण्याची हीच योग्य वेळ आहे”, असे नादालने गेल्या आठवड्यात सीएनबीसीशी बोलताना सांगितले होते.

नादालने नुकतेच कॅनरी बेटांवरील फ्युएर्टेव्हेंचुरा येथे आपले चौथे ‘झेल हॉटेल’ सुरु केले आहे. समुद्रकिनारी असलेले हे हॉटेल केवळ प्रौढांसाठी आहे. नादालने स्पष्ट केले की, आपल्या २३ वर्षांच्या टेनिस कारकिर्दीतील बहुतेक काळ हॉटेल्समध्ये राहिल्यानंतर, स्वतःचे हॉटेल सुरू करणे ही एक स्वाभाविक पुढची पायरी होती.

त्याने २०२२ मध्ये ‘मेलिया हॉटेल्स इंटरनॅशनल’च्या भागीदारीत ‘झेल हॉटेल्स’ या हॉस्पिटॅलिटी ब्रँडची स्थापना केली. अवघ्या एका वर्षानंतर, या ब्रँडने आपले पहिले हॉटेल, ‘झेल मालोर्का’ सुरू केले आणि त्यानंतर स्पेनमधील कोस्टा ब्रावा व डॉमिनिकन रिपब्लिकमधील पुंता काना येथे दुसरे आणि तिसरे हॉटेल सुरू केले.

हॉटेल्स हा त्याच्या वाढत्या व्यावसायिक साम्राज्याचा केवळ एक भाग आहे. नादालने टेनिसनंतर हॉस्पिटॅलिटी, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांमधील आपला व्यवसाय वाढवला आहे, ज्यापैकी बहुतांश व्यवसाय त्याच्या कुटुंबाची होल्डिंग कंपनी एस्पेमिरमार्फत व्यवस्थापित केला जातो.

“हा नक्कीच माझ्यासाठी आयुष्यभराचा प्रकल्प आहे आणि खूप पर्सनल आहे. कंपनी गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे आणि आम्हाला वाटले की ही वाढ कायम राहण्यासाठी आम्हाला थोड्या मदतीची गरज आहे”, असे नदाल पुढे म्हणाले.

राफा नदाल अकादमीतून ९१८ कोटींची कमाई

‘झेल हॉटेल्स’ सुरू करण्यापूर्वी, नादालने २०१६ मध्ये मॅलोर्का येथे उच्च दर्जाच्या टेनिस प्रशिक्षणासाठी ‘राफा नदाल अकादमी’ची स्थापना केली होती. ही अकादमी आता मेक्सिको, ग्रीस, कुवेत, हाँगकाँग आणि डोमिनिकन रिपब्लिकसह अनेक ठिकाणी क्रीडा केंद्रांचे एक मोठे जाळे बनली आहे.

२०२५ मध्ये, नदालने आपल्या अकादमीचा ४४.९% हिस्सा ‘जीपीएफ कॅपिटल’ या खाजगी गुंतवणूक कंपनीला विकला. या व्यवहारानंतर नदालकडे ५५.१% हिस्सा आणि बहुमताचे नियंत्रण कायम आहे. तसेच त्याला या व्यवहारातून रोख स्वरूपात सुमारे सुमारे ९१८ कोटी रुपये मिळाले होते.