नवी दिल्ली : विद्युत शक्तीवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या टेस्ला कंपनीने देशांतर्गत वाहन विक्रीला चालना देण्यासाठी ईएमआय योजनेसह विविध उपक्रम सुरू केले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलसारख्या जैविक इंधनाकडून विद्युत शक्तीवर चालणाऱ्या अर्थात ईव्ही वाहनांकडे वळणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी, टेस्ला ३ लाख रुपयांचे एक्सचेंज इन्सेंटिव्ह अर्थात गाडी बदलासाठी प्रोत्साहन देऊ करणार आहे. याव्यतिरिक्त, ग्राहक आता मॉडेल वाय फक्त ६ लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह, दरमहा ४९,००० रुपयांच्या हप्त्यांमध्ये खरेदी करू शकतात, ज्यामुळे प्रीमियम इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा अडथळा दूर होण्यास मदत होईल, असे कंपनीने पुढे म्हटले आहे.

टेस्ला इंडियाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मॉडेल वायची विक्री सुरू केली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन अर्थात ‘फाडा’ने दिलेल्या ईव्ही विक्रीच्या आकडेवारीनुसार, टेस्ला इंडियाने गेल्या वर्षी २२५ वाहनांची विक्री केली आहे. एकूण इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री गेल्या वर्षी १,७६,८१७ वाहनांवर पोहोचली, जी २०२४ कॅलेंडर वर्षातील ९९,८७५ वाहनांच्या तुलनेत ७७ टक्क्यांनी अधिक आहे.

गेल्यावर्षी जुलै महिन्यात देशातील पहिले टेस्ला शो रूम मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे सुरू करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील पहिल्या ‘टेस्ला एक्सपीरियन्स सेंटर’ चे उदघाटन केले होते. तर, या टेस्ला कंपनीच्या मोटारीला टोलमाफीही मिळाली आहे. राज्य महामार्गावरील प्रवासासाठी टेस्लाच्या वाहनाला पथकर द्यावा लागणार नाही.

टेस्ला मॉडेल वाय खरेदी करण्याचा फायदा काय?

टेस्ला मॉडेल वायकडे वळल्याने ग्राहक इंधन आणि देखभालीचा खर्च कमी करून दरमहा २०,००० रुपयांपर्यंत बचत करू शकतात, असा दावा टेस्लाने केला आहे.