TikTok Zhang Yiming Net Worth 2026 : आशियातील श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ झाली आहे. एकेकाळी भारतात लोकप्रिय असलेल्या ‘टिकटॉक’ या शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅपची मूळ कंपनी ‘बाइटडान्स’चे सहसंस्थापक झांग यीमिंग यांनी मोठी झेप घेतली आहे. ते आता आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. झांग यीमिंग यांनी भारताचे दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकत हा बहुमान पटकावला आहे. यापूर्वीच अदानी समूहाचे गौतम अदानी यांनी अंबानींना ओव्हरटेक करत अव्वल स्थान पटकावलं आहे. मागील काही महिने रिलायन्स समूहासाठी आव्हानात्मक ठरत आहेत.

७ वर्षांत संपत्तीत ७ पटीने वाढ

‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’च्या ताज्या आकडेवारीनुसार, झांग यीमिंग यांची एकूण संपत्ती वाढून ९२.८ अब्ज डॉलर्स झाली आहे. संपत्तीतील या वाढीनंतर ते आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले असून चीनमधील सर्वात श्रीमंत देखील बनले आहेत. मार्च २०१९ मध्ये जेव्हा ब्लूमबर्गने पहिल्यांदा त्यांच्या संपत्तीचा मागोवा घेतला. तेव्हा त्यांची संपत्ती सुमारे १३ अब्ज डॉलर्स होती. म्हणजेच ७ वर्षांत त्यांच्या संपत्तीत ७ पटीहून अधिक वाढ झाली आहे.

‘टिकटॉक’ आणि एआय चॅटबॉट ‘डोबाओ’ची जादू

भारतात टिकटॉक प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रात्रीतून बॅन करण्यात आले. मात्र, जगभरात याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. यासोबतच बाइटडान्सचा ‘डोबाओ’ हा चॅटबॉट सध्या चीनमधील सर्वात लोकप्रिय एआय चॅटबॉट बनला आहे. त्याचे मासिक सक्रिय युझर्स ३० कोटींच्या पार गेले आहेत. कंपनी लवकर ही सेवा सशुल्क करणार असून, यामुळे कंपनीचा महसूल आणखी वाढणार आहे.

अमेरिकन गुंतवणुकीमुळे पाया भक्कम

भारतानंतर अमेरिकेतही टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत होती. मात्र, बाइटडान्सने अत्यंत हुशार धोरणात्मक पाऊल उचलले आहे. कंपनीने आपल्या अमेरिकन व्यवसायातील काही भाग ओरेकल, सिल्व्हर लेक आणि अबू धाबीची गुंतवणूक कंपनी ‘एमजीएक्स’ यांसारख्या बलाढ्य अमेरिकन गुंतवणूकदार समूहाकडे हस्तांतरित केला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत टिकटॉकवर येणारा संभाव्य बंदीचा धोका आणि कायदेशीर अनिश्चितता बऱ्याच अंशी कमी झाली आहे. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांवर झाला.

मुकेश अंबानी तिसऱ्या स्थानी, तर गौतम अदानी आशियात ‘नंबर वन’

या नव्या जागतिक क्रमवारीत भारतीय अब्जाधीशांच्या स्थानांमध्येही बदल झाले आहेत. रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आता ८६.९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी हे मात्र ११७.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील ‘सर्वात श्रीमंत व्यक्ती’ म्हणून आपले अव्वल स्थान टिकवून आहेत.