ठाणे : टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडमध्ये भवानी सहकारी बँक लिमिटेडचे विलीनीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. रिझर्व्ह बँकेने ३० एप्रिलला या विलीनीकरणाला मंजुरी दिली असून ४ मे २०२६ पासून हे विलीनीकरण पूर्णत्वास आले आहे.
रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४४अ आणि कलम ५६ नुसार ही मान्यता देण्यात आली असून या धोरणात्मक निर्णयामुळे टीजेएसबी बँकेचा मुंबई शहरात विस्तार झाला आहे. भवानी सहकारी बँकेचे विलीनीकरण हे केवळ विस्तारीकरण नसून, सहकारी बँकिंग क्षेत्रात स्थान अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने उचललेले दमदार आणि धोरणात्मक पाऊल आहे. या विलीनीकरण प्रक्रियेतून मोठ्या ग्राहक वर्गाला दर्जेदार बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न आहे, असे विस्ताराच्या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष शरद गांगल म्हणाले.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये टीजेएसबी सहकारी बँकेने २५,३६० कोटींचा एकूण व्यवसाय नोंदवला आहे. यात १६,२४४ कोटींच्या ठेवी आणि ९,११६ कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. या विलीनीकरणानंतर बँकेचे सात राज्यांत १७१ शाखांचे जाळे निर्माण झाले आहे.
या विलीनीकरणामुळे भवानी सहकारी बँकेच्या ग्राहकांना आधुनिक डिजिटल बँकिंग सुविधा आणि विश्वासार्ह सेवेचा लाभ मिळेल. यामुळे त्या ग्राहकांचा बँकिंग अनुभव अधिक सुरक्षित, गतिमान आणि सुलभ होईल, असे बँकेचे उपाध्यक्ष सीए वैभव सिंगवी म्हणाले. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर म्हणाले, नेहमीच ग्राहक-केंद्रित सेवा आणि शाश्वत वाढीवर भर राहिला.
भवानी बँकेच्या समावेशामुळे मुंबई शहरात शाखांचे जाळे अधिक मजबूत होईल. ग्राहकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार बँकिंग सेवा नियमितपणे देता येईल. १९७२ मध्ये स्थापन झालेली टीजेएसबी बँक ही महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड अशा सात राज्यांत कार्यरत असलेली अग्रगण्य सहकारी बँक आहे. बँक ग्राहक केंद्रित दृष्टीकोन, गतिमान वित्त सेवा, आधुनिक तंत्रज्ञान आधारित सुविधा यासाठी ओळखली जाते.
