ठाणे : टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडने नुकताच ५४ वा वर्धापनदिन साजरा करताना, कल्पक डिजिटल सेवा, व्यवसाय वाढीवर केंद्रित धोरणानुसार, सहकारी बँकांची विलीनीकरणासह, अन्य राज्यात विस्ताराची योजना जाहीर केली आहे. आपल्या क्षितिजांचा विस्तार अशी या वर्षाची बँकेची संकल्पना यातून स्पष्टपणे निदर्शनास येते.
वर्धापनदिनाच्या निमित्ताने सहकारी बँकिंग क्षेत्रातील विलीनीकरणाद्वारे वाढीवरही भर देण्यात आला आहे. वर्ष २०२५ मध्ये सिटिझन को-ऑपरेटिव्ह बँक लि, गोवा आणि सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. या बँकांनी टीजेएसबीने यशस्वी विलीन करून घेतले. त्यामुळे गोवा आणि सिंधुदुर्ग येथे बँकेची स्थिती अधिक भक्कम झाली.
याच धोरणाच्या पुढील टप्प्यात भवानी सहकारी बॅंकेच्या विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. यातून मुंबई परिसरात बँकेचे कामकाज अधिक गतिमान होईल. या विलीनीकरणामुळे नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानाधिष्ठित बँकिंग सेवा देणारी मजबूत बँक असे टीजेएसबी सहकारी बँकेचे स्थान अधोरेखित झाले आहे.
बँकेच्या विस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, टीजेएसबी सहकारी बँकेने राजस्थान आणि छत्तीसगड या दोन नव्या राज्यांमध्ये पदार्पणाची घोषणा केली. जयपूर आणि रायपूर येथे लवकरच बँकेच्या नवीन शाखा सुरू होणार आहेत. यामुळे बँक आपल्या पारंपरिक व्यावसायिक क्षेत्रांपलीकडे विस्तारून राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवेल.
बँकेने ग्राहकांची सुविधा, सुरक्षितता आणि गतीमान सेवा देणाऱ्या डिजिटल उपक्रमांची देखील घोषणा केली. टीजेएसबीची वाढ ही नेहमीच ग्राहकांचा विश्वास, कार्यक्षम प्रशासन आणि सहकारी मूल्यांवर आधारित राहिली आहे, असे टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितले.

