Business Loan : आर्थिक पाठबळ नसल्याने अनेक तरुणांचे व्यावसायिक होण्याचे स्वप्न अधुरे राहत होते. आता तुमचे उद्योजक होण्याचे स्वप्न सरकारच्या मदतीने पूर्ण करता येणार आहे. केंद्र सरकारकडून लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत. ज्यामध्ये विनाहमी आणि कमी व्याजदरात कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला जातो. भारताच्या जीडीपीमध्ये सुमारे ३० टक्के वाटा असणाऱ्या या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार विविध स्तरांवर कर्ज आणि अनुदानाची सुविधा देत आहे.
देशातील ११ कोटींहून अधिक लोकांना रोजगार देणाऱ्या लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी सरकारने अनेक कर्ज योजना सुरू केल्या आहेत. यामुळे केवळ नवीन उद्योजकांनाच नाही, तर आपला जुना व्यवसाय वाढवू इच्छिणाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनाच्या मार्फत तुम्ही २ कोटी रुपयांपर्यंत कर्ज सहज मिळवू शकता
प्रधानमंत्री मुद्रा योजना : लघू उद्योजकांसाठी आधार
- २०१५ मध्ये सुरू झालेली ही योजना छोट्या व्यापाऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये कोणत्याही तारणाशिवाय तीन गटांत कर्ज दिले जाते.
- शिशू कर्ज : ५०,००० रुपयांपर्यंत.
- किशोर कर्ज : ५०,००० ते ५ लाख रुपयांपर्यंत.
- तरुण कर्ज : ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत.
प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम : ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान
प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम हा नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये उत्पादन क्षेत्रासाठी २५ लाख आणि सेवा क्षेत्रासाठी १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे १५% ते ३५% पर्यंत सबसिडी मिळते, म्हणजेच कर्जाचा मोठा हिस्सा माफ होऊ शकतो.
२ कोटींपर्यंतचे विनाहमी कर्ज
ज्या उद्योजकांकडे बँक गॅरंटीसाठी जमीन किंवा मालमत्ता नाही, त्यांच्यासाठी ‘क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस’ ही योजना वरदान आहे. या योजनेत २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण मिळते. ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सरकार ८५% गॅरंटी कव्हर देते.
उद्योग सुधारणेसाठी CLCSS आणि ‘स्माइल’ योजना
CLCSS या योजनेत जुन्या मशिनरी बदलून आधुनिक तंत्रज्ञान घेण्यासाठी १ कोटीपर्यंतच्या कर्जावर १५% सबसिडी दिली जाते. तर ‘स्माइल’मध्ये मशिनरीसाठी १० लाख आणि इतर कामांसाठी २५ लाखांपर्यंत ‘सॉफ्ट लोन’ दिले जाते. याची परतफेड करण्यासाठी १० वर्षांचा मोठा कालावधी मिळतो.
५९ मिनिटांत कर्ज मंजुरी
डिजिटल युगात कर्ज प्रक्रिया वेगवान करण्यासाठी ‘psbloansin59minutes’ हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. जीएसटी आणि आयटीआर भरणाऱ्या उद्योजकांना १ लाख ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाची तत्त्वतः मंजुरी केवळ ५९ मिनिटांत मिळण्याची सुविधा यात आहे.
