TRAI Mandated Packs Telecom Recharge Rules : दूरसंचार कंपन्यांच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर ग्राहकांना ‘ट्राय-मॅन्डेटेड पॅक्स’ सहज दिसावेत, यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कंपन्यांना निर्देश दिले आहेत. प्रीपेड रिचार्जच्या विभागात ‘ट्राय-मॅन्डेटेड पॅक्स’ नावाचा स्वतंत्र आणि स्पष्ट टॅब सर्वप्रथम दिसेल अशा पद्धतीने ठेवावा, असे ट्रायने म्हटले आहे.
ग्राहकांच्या तक्रारीनंतर ट्रायने विविध दूरसंचार कंपन्यांच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपची पाहणी केली. त्यावेळी अनिवार्य करण्यात आलेले रिचार्ज प्लॅन सहजपणे दिसत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांनी प्रीपेड रिचार्ज विभागात ‘ट्राय-मॅन्डेटेड पॅक्स’ नावाचा स्वतंत्र टॅब किंवा विभाग तयार करावा. या विभागात ट्रायने अनिवार्य केलेले विविध प्रकारचे व्हाउचर स्पष्टपणे दाखवावेत. हा टॅब वेबसाइट आणि मोबाइल अॅपवरील प्रीपेड रिचार्ज विभागात पहिल्याच क्रमांकावर असावा, असे ट्रायने स्पष्ट केले आहे. कंपन्यांच्या स्वतंत्र विक्री केंद्रांवरही हे प्लॅन ठळकपणे प्रदर्शित करावे लागणार आहेत. ट्रायने दिलेल्या निर्देशांचे पालन आदेश जारी झाल्यापासून ३० दिवसांच्या आत करणे दूरसंचार कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.
व्हॉइस आणि एसएमएससाठी स्वतंत्र व्हाउचर
यापूर्वी ट्रायने दूरसंचार कंपन्यांना केवळ व्हॉइस कॉल आणि एसएमएससाठी स्वतंत्र स्पेशल टॅरिफ व्हाउचर (एसटीव्ही) उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. या व्हाउचरमध्ये डेटा सेवा समाविष्ट करणे आवश्यक नसणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या डेटा, व्हॉइस कॉल आणि एसएमएसच्या एकत्रित सुविधांच्या व्हाउचरप्रमाणेच हे स्वतंत्र व्हाउचर असतील. त्यांची वैधता ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी ठेवावी लागणार आहे. प्रीपेड ग्राहकांसाठी एसटीव्ही हे अतिरिक्त लाभ मिळवून देणाऱ्या ‘बूस्टर रिचार्ज’प्रमाणे काम करते. अतिरिक्त रक्कम भरून आंतरराष्ट्रीय कॉल कमी दरात करणे किंवा विद्यमान प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलची सुविधा घेणे यांसारखे लाभ ग्राहकांना मिळू शकतात.
ग्रामीण ग्राहकांना फायदा
डेटा सुविधा असलेल्या काही एसटीव्हींची वैधता ३६५ दिवसांपर्यंत आहे. मात्र, ट्रायच्या नव्या नियमनाचा भर ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधता असलेल्या व्हाउचरवर आहे. कमी उत्पन्न गटातील तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार कमी किमतीचे प्लॅन निवडणे यामुळे सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
ट्रायच्या पाहणीत मात्र या अनिवार्य व्हाउचरची वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर पुरेशी पारदर्शकता, दृश्यमानता आणि सहज उपलब्धता नसल्याचे आढळले. काही कंपन्यांनी हे व्हाउचर वेगवेगळ्या विभागांमध्ये ठेवले होते, तर काही ठिकाणी ते शोधण्यासाठी ग्राहकांना अनेक पृष्ठे किंवा स्क्रीनवर जावे लागत होते.
प्रत्येक कंपनीला तीन प्रकारचे प्लॅन अनिवार्य
ट्रायच्या निर्देशांनुसार प्रत्येक दूरसंचार कंपनीला किमान एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर, प्रत्येकी ३० दिवसांची वैधता असलेले, उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.
