Trump Accounts One Big Beautiful Bill Act of 2025 benefits and launch updates: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल ॲक्ट ऑफ २०२५’ अंतर्गत ट्रम्प अकाउंट्स ही योजना जाहीर केली होती. या योजनेचा ४ जुलै २०२६ रोजी शुभारंभ होणार आहे. ट्रम्प अकाउंट्स हे अमेरिकन नागरिकांसाठी नवीन कर-सवलत मिळवून देणारे गुंतवणूक खाते आहे. तसेच, अमेरिकन मुलांना अगदी लहान वयातच गुंतवणूक करण्यास मदत करणे हा यामागचा उद्देश आहे. या खात्यांसाठी पात्रतेचे नियम, गुंतवणुकीच्या रकमेच्या मर्यादा आणि गुंतवणुकीबाबतच्या काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. तसेच, काही मुलांसाठी सरकारकडून १ हजार डॉलर्सची सुरुवातीची गुंतवणूक केली जाणार आहे.

ट्रम्प अकाउंट्स म्हणजे काय?

ट्रम्प अकाउंट्स हा १८ वर्षांखालील मुलांसाठीचा एक प्रकारचा वैयक्तिक निवृत्ती बचत निधी आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘वन बिग ब्युटीफुल बिल ॲक्ट ऑफ २०२५’ अंतर्गत ही योजना अंमलात आणली गेली आहे. या योजनेअंतर्गत, २०२५ ते २०२८ या कालावधीत जन्मलेल्या बाळांसाठी अमेरिकेच्या वित्त विभागाकडून १ हजार डॉलर्सचे एकरकमी योगदान दिले जाणार आहे.

ट्रम्प अकाउंट्सचे काम कसे चालणार?

ट्रम्प अकाउंट्सचे काम काही अपवाद वगळता ‘आयआरए’ (वैयक्तिक निवृत्ती खाते) प्रमाणेच चालणार आहे. ट्रम्प अकाउंट्समध्ये कुटुंब किंवा कंपनी यांसारख्या विविध स्रोतांकडून निधी जमा केला जाऊ शकतो आणि या निधीवर मिळणाऱ्या परताव्यावर कर-संबंधित विविध लाभ मिळतील.

यातील रक्कम अमेरिकेतील स्टॉक फंड्समध्ये गुंतवली जाईल आणि बँक ऑफ न्यूयॉर्क मेलन अधिकृतपणे या सुरुवातीच्या खात्यांचे व्यवस्थापन करेल. ट्रम्प अकाउंट्स ॲपद्वारे पालक खात्यातील व्यवहार तपासू शकतील.

ट्रम्प अकाउंट्ससाठी कोण पात्र?

अमेरिकेतील १८ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या सर्व मुलांसाठी ट्रम्प अकाउंट्स ही योजना उपलब्ध असेल. कोणतीही अधिकृत व्यक्ती, जसे की कायदेशीर पालक, आई-वडील, प्रौढ भावंड किंवा आजी-आजोबा, मुलाच्या वतीने ट्रम्प अकाउंट उघडू शकतील. मात्र, यासाठी अट अशी आहे की, संबंधित मूल हे अमेरिकेचे नागरिक असावे आणि त्याच्याकडे कामासाठी अधिकृत असलेला सोशल सिक्युरिटी नंबर असावा.

ट्रम्प अकाउंट्सद्वारे कशात गुंतवणूक करता येणार?

ब्रोकरेज अकाउंट्सप्रमाणे ट्रम्प अकाउंट्समध्ये वैयक्तिक स्टॉक्स किंवा सट्टेबाजीच्या मालमत्तेत गुंतवणूक करता येत नाही. निधीची गुंतवणूक कमी खर्चाच्या इंडेक्स म्युच्युअल फंडांमध्ये किंवा एस अँड पी ५०० सारख्या अमेरिकन शेअर बाजारांचा मागोवा घेणाऱ्या ईटीएफमध्ये करणे आवश्यक आहे.

वयाच्या १८ वर्षांपर्यंत पैसे काढता येणार नाहीत

ट्रम्प अकाउंट्सचा उद्देश दीर्घकालीन संपत्ती निर्मिती हा आहे. वयाच्या १८ वर्षांपूर्वी यातून पैसे काढण्याची परवानगी नाही. या निर्बंधामुळे खात्यातील रकमेचा वापर दैनंदिन खर्चासाठी करता येत नाही आणि गुंतवणुकीला चक्रवाढ परताव्याचा लाभ मिळण्यासाठी अधिक वेळ मिळतो.