Trump Meme Coin: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे दुसऱ्यांदा हाती घेतल्यापासून, ते सतत या ना त्या कारणाने चर्चेत आहेत. अशात त्यांनी जाहीर केलेल्या त्यांच्या २०२५ च्या उत्पन्नामध्ये क्रिप्टो करन्सीमधून मिळालेल्या नफ्याचा वाटा सर्वाधिक असून, यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

दरम्यान, क्रिप्टोकरन्सी विश्लेषक संस्था ‘नॅन्सेन’ने केलेल्या विश्लेषणानुसार ट्रम्प यांचे समर्थक आणि त्यानंतर ‘क्रिप्टो’ गुंतवणूकदार बनलेल्या लोकांची आकडेवारी समोर आली आहे आणि या सर्वच गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे ‘मीम-कॉइन’ खरेदी करणाऱ्या जवळपास १० लाख गुंतवणूकदारांचे जून अखेरपर्यंत सुमारे ३२ हजार कोटी रुपये इतके नुकसान झाले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या नियमानुसार २०२५ चे वार्षिक आर्थिक उत्पन्न जाहीर केले आहे. यातून असे समोर आले की, त्यांना क्रिप्टो संबंधित व्यवहारातून सुमारे ५,४७० कोटी रुपये कमाई झाली आहे. ही रक्कम २०२५ मधील त्यांच्या सर्व व्यावसायिक उपक्रमांतून मिळालेल्या किमान १८,९२० कोटी रुपये या एकूण उत्पन्नाचाच एक भाग आहे.

ट्रम्प यांच्या क्रिप्टो गुंतवणुकीत परिस्थिती नेहमीच त्यांच्या बाजूने राहिली. त्यांच्या मेमेकॉइनची किंमत वाढली किंवा कमी झाली तरी ट्रम्प यांना नफा होत होता. जेव्हा कोणी त्यांच्या ‘मीम-कॉइन’मध्ये ट्रेड करत असे, तेव्हा ट्रम्प यांना नफा मिळत असे. यानंतर ते आपल्या ‘ट्रुथ सोशल’ उकाउंटवरून त्या कॉइनचा प्रचार करत, आपल्या फॉलोअर्सना यामध्ये गुंतवणूक करण्यास वारंवार प्रोत्साहित करत असत.

एकेकाळी क्रिप्टोबद्दल साशंक असलेल्या ट्रम्प यांनी २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे असताना, डिजिटल चलनांमधील नफा कमावण्याच्या संधीचा स्वीकार केला. त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी ‘वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल’ नावाची एक क्रिप्टो स्टार्टअप कंपनी स्थापन केली.

आपल्या दुसऱ्या शपथविधीच्या तीन दिवस आधी, ट्रम्प यांनी दुसरी ट्रम्प-ब्रँडेड गुंतवणूक सादर केली. ज्याचे नाव ‘ट्रम्प मीम-कॉइन’ असे होते. ज्यचे व्यावहारिक मूल्य नगण्य आहे.

‘ट्रम्प मीम-कॉइन’मध्ये ९७ टक्क्यांची घसरण

‘नॅन्सेन’च्या (Nansen) आकडेवारीनुसार, ट्रम्प यांचा सल्ला माणून या कॉनइमध्ये गुंतवणूक केलेल्या ९,८८,९०५ गुंतवणूकदारांचे एकूण ३२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये अशा गुंतवणूकदारांचाही समावेश आहे ज्यांनी आपली गुंतवणूक कायम ठेवली असून त्यांना केवळ कागदोपत्री तोटा झाला आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाला त्या दिवशी (शुक्रवारी, ३ जुलै २०२६) या कॉइनची किंमत १.७६ डॉलर्स इतकी होती, जी त्याच्या ७५.३५ डॉलर्स या उच्चांकी किमतीच्या तुलनेत ९७ टक्क्यांनी कमी आहे.