TVK chief Vijay net worth 2026 : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत ‘तमिळगा वेत्री कळघम’ अर्थात टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. यानिमित्ताने दाक्षिणात्य सुपरस्टार आणि पक्षाचे प्रमुख विजय यांच्या संपत्तीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. साधारणपणे श्रीमंत व्यक्ती आपली संपत्ती रिअल इस्टेट, शेअर बाजार, म्युच्युअल फंड अशा स्वरुपात गुंतवणे पसंत करतात. मात्र, विजय याला अपवाद ठरले असून त्यांच्या ६२४ कोटी रुपयांचे विभागणी पाहिली तर कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे, २०२४-२५ या आर्थिक वर्षात विजय यांचे उत्पन्न १८४.५३ कोटी रुपये इतके होते, ज्याचा मुख्य स्रोत स्वयंरोजगार, भाडे आणि व्याजातून मिळणारे उत्पन्न आहे.

एकाच बचत खात्यात २१३ कोटींची अवाढव्य रक्कम

विजय यांच्या शपथपत्रातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम. चेन्नईतील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या सालिग्रामम शाखेतील एकाच बचत खात्यात २७ मार्च २०२६ पर्यंत तब्बल २१३.३६ कोटी रुपये जमा होते. ही कोणतीही गुंतवणूक नसून साधे ‘सेव्हिंग बॅलन्स’ आहे, जी त्यांच्या एकूण संपत्तीच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त आहे. याशिवाय, विविध चार बँकांमध्ये त्यांच्या १०० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. शेअर बाजारातील त्यांची गुंतवणूक अत्यंत नगण्य आहे. त्यांच्याकडे असलेल्या सर्व शेअर्सची एकूण मालकी १९.३७ लाख रुपये इतकी असून, ती त्यांच्या घोषित एकूण संपत्तीच्या ०.०४ टक्क्यांहूनही कमी आहे. यामध्ये कोणत्याही म्युच्युअल फंड, रोखे किंवा डिबेंचर्सचा उल्लेख नाही.

२२० कोटींचे रिअल इस्टेट साम्राज्य

  • निवासी मालमत्ता : नीलंकरई, सालिग्रामम आणि मायलापूर यांसारख्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये ११५ कोटी रुपये किमतीची १० घरे आहेत.
  • व्यावसायिक मालमत्ता : त्यागराया आणि कोप्पूरसह विविध ठिकाणी ८२.८ कोटींच्या व्यावसायिक इमारती आहेत. कोप्पूरमधील २.३० एकरची जागा त्यांनी २०२३ मध्ये ३५.८१ कोटींना खरेदी केली होती.
  • शेत जमीन : कोडाकॅनाल येथील विल्पाट्टी गावात प्रत्येकी ०.२५ एकरचे दोन भूखंड आहेत, जे १९९७ मध्ये केवळ १५,००० रुपयांना घेतले होते, त्यांची किंमत आता प्रत्येकी १० लाख रुपये आहे.
  • विजय हे ‘जया नगर प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड’ या रिअल इस्टेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत.

१३.५२ कोटींचा लक्झरी गाड्यांचा ताफा

  • २०२४ टोयोटा लेक्सस ३५० (३.०१ कोटी रु.)
  • २०१५ टाटा कारवान (६ कोटी रु.)
  • २०२४ बीएमडब्ल्यू i7 (२ कोटी रु.)
  • २०१४ टोयोटा वेलफायर (१.६३ कोटी रु.)
  • याशिवाय त्यांच्याकडे मारुती स्विफ्ट आणि टीव्हीएस एक्सएल सुपर यांसारखी साधी वाहनेही आहेत.

७५.५ कोटींचे कर्ज वाटप

विजय यांनी स्वतः १४ वेगवेगळ्या व्यक्ती आणि संस्थांना एकूण ७५.५ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. यामध्ये ए. एल. पी. अँटोनियस ब्रिटो (२० कोटी) आणि कोकिलांबल एज्युकेशनल फाउंडेशन (२० कोटी) यांना दिलेल्या मोठ्या रकमांचा समावेश आहे. तसेच त्यांनी पत्नी संगीता यांना १२.६० कोटी, तर मुले जेसन संजय आणि दिव्या साशा यांनाही काही लाख रुपयांचे कर्ज दिले आहे.

दागिने आणि पत्नीची संपत्ती

विजय यांच्याकडे १.२० कोटींचे सोने (८८३ ग्रॅम) आणि १५ लाखांची चांदी आहे. तर त्यांच्या पत्नी संगीता यांच्याकडे ४.०७ कोटींचे सोने (३,१३२ ग्रॅम), १ कोटींचे हिरे (१३४.९१ कॅरेट) आणि चांदी आहे. संगीता विजय यांची स्वतंत्र मालमत्ता १५.७६ कोटी रुपये आहे.