Uber layoffs : आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे टेक क्षेत्रात सध्या नोकरकपातीचे सत्र सुरू आहे. आता याचे वारे इतर क्षेत्रालाही लागले असल्याचे दिसत आहे. जागतिक स्तरावर टॅक्सी आणि डिलिव्हरी सेवा पुरवणारी दिग्गज कंपनी ‘उबर’ने त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. उबेरने आपल्या एचआर आणि भरती प्रक्रियेतील तब्बल २३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या अध्यक्षपदी नव्याने नियुक्ती झालेल्या जील हेझलबेकर यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, या कपातीचा एआयशी काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
उबरने नोकरकपातीचा निर्णय का घेतला?
उबरचे सीईओ दारा खोस्रोशाही यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका अंतर्गत मेमोमध्ये या कठोर निर्णयाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, “भविष्यातील संधी आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी टीमची कार्यक्षमता वाढवणे अत्यंत गरजेचे होते. दरम्यान, किती लोकांना काढणार याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. मात्र, उबरच्या प्रवक्त्याने ‘सीएनबीसी’ला दिलेल्या माहितीनुसार, ही कपात उबरच्या जगभरातील एकूण ३४,००० कर्मचाऱ्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
कपातीसाठी आयटीचा फॉर्म्युला?
कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्या आपली टीम कमी करत असल्याचे चित्र आहे. गुगलपासून मेटापर्यंत अनेक कंपन्या आपली टीम संकुचित करत आहे. जील हेझलबेकर यांच्या मते, लोकांचे व्यवस्थापन करणारा एचआर विभाग काळाच्या ओघात अतिशय गुंतागुंतीचा बनला होता. अनेक ठिकाणी एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या टीम्स काम करत होत्या, कोणाकडे नेमकी जबाबदारी आहे हे स्पष्ट नव्हते. म्हणूनच, ही पुनर्रचना करून कामातील अडथळे दूर करणे आणि टीम्सना थेट बिझनेसच्या जवळ आणणे हा या कपातीमागचा मुख्य उद्देश आहे.
टाळेबंदीमागे एआय कारण नाही?
सध्या जगभरातील अनेक मोठ्या टेक कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर पुढे करून कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. मात्र, उबरने आपल्या एचआर विभागातील या टाळेबंदीचा एआय तंत्रज्ञानाशी थेट कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. जरी या नोकरकपातीचे कारण एआय नसले, तरी उबर कंपनी अंतर्गत कामांमध्ये एआय टूल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. गेल्याच महिन्यातच सीईओ दारा खोस्रोशाही यांनी सांगितले होते, की एआय टूल्समुळे सध्याचे कर्मचारी अधिक कार्यक्षम बनले आहेत, त्यामुळे आता नवीन नोकरभरती कमी प्रमाणात करत आहोत.
एआयचा अवाढव्य खर्च
एआयमुळे कर्मचाऱ्यांचे काम सोपे होत असेल तरी कंपन्यांवर याचा प्रचंड आर्थिक बोजा पडत आहे. ‘द इन्फॉर्मेशन’च्या अहवालानुसार, उबरने वर्ष २०२६ चे संपूर्ण एआय बजेट अवघ्या ४ महिन्यांतच खर्च करून फस्त केले होते. या पार्श्वभूमीवर, कंपनीने कर्मचाऱ्यांना एआयचा वापर मर्यादीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
