Uday Kotak Global Financial Crisis Warning analysis: ज्येष्ठ बँकर उदय कोटक यांनी वाढते सरकारी कर्ज आणि तूट यामुळे जपान व अमेरिकेतील सरकारी रोख्यांवरील परताव्याचा दर वाढत असल्याने जागतिक व्याजदर बाजारात संभाव्य अस्थिरता निर्माण होण्याचा इशारा दिला.
“जपानचा १० वर्षांच्या सरकारी रोख्यांवरील परताव्याचा दर ३ टक्के आणि अमेरिकेचा ४.८ टक्क्यांची पातळी ओलांडत आहे. त्यांचे सरकारी कर्ज आणि तूट वाढत असल्याने, मध्यवर्ती बँकांकडे ताळेबंद वाढवण्याशिवाय (पैसे छापण्याशिवाय) पर्याय उरणार नाही”, असे कोटक यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे.
“जर असे झाले, तर महागाई वाढेल, अल्प मुदतीचे व्याजदर वाढतील. त्यामुळे व्याजदर बाजारातील रोलर कोस्टर राईडसाठी (अस्थिरतेसाठी) तयार रहा!”, असेही ते पुढे म्हणाले.
त्यांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा जपानच्या १० वर्षांच्या सरकारी रोख्यांच्या परतावा दराने मंगळवारी सप्टेंबर १९९६ नंतर प्रथमच ३ टक्क्यांचा टप्पा ओलांडला, तर अमेरिकेच्या १० वर्षांच्या ट्रेझरी रोख्यांच्या परतावा दराने ऑक्टोबर २०२३ नंतरची सर्वोच्च पातळी गाठत सुमारे ४.७८ टक्क्यांपर्यंत मजल मारली.
जागतिक रोख्यांवरील परताव्याच्या दरात झालेली मोठी वाढ ही महागाई, सरकारी आर्थिक स्थिती आणि व्याजदर दीर्घकाळापर्यंत उच्च पातळीवर राहण्याची शक्यता यांबाबत गुंतवणूकदारांच्या वाढत्या चिंतेचे प्रतिबिंब आहे.
जपानमध्ये, १० वर्षीय रोख्यांवरील परताव्याचा दर गेल्या दोन वर्षांत तिप्पट झाला आहे. महागाई, देशाची आर्थिक स्थिती आणि ‘बँक ऑफ जपान’ला व्याजदर वाढीचा वेग वाढवावा लागू शकतो यांसारख्या अपेक्षांमुळे हा दर वरच्या दिशेने जात आहे. जपानच्या अल्प मुदतीच्या सरकारी रोख्यांवरील परतावा देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
या महिन्यात होणाऱ्या बैठकीत बँक ऑफ जपान व्याजदर वाढवेल हे बाजाराने जवळपास निश्चित मानल्यामुळे, पाच वर्षांच्या रोख्यांवरील परतावा २.२६५ टक्के या विक्रमी पातळीवर पोहोचला, तर दोन वर्षांच्या रोख्यांवरील परतावा १.८१ टक्के या ३१ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
महागाईचा दबाव आणि जपानी चलन येनचे मूल्य चार दशकांतील नीचांकी पातळीजवळ स्थिरावल्यामुळे, बँक ऑफ जपानवर व्याजदर अधिक वेगाने वाढवण्याचा दबाव वाढला आहे.
अमेरिकेची परिस्थिती
अमेरिकेत १० वर्षीय सरकारी रोख्यांवरील परतावा वाढून सुमारे ४.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर २ वर्षीय रोख्यांवरील परतावा पुन्हा ४.३ टक्क्यांच्या दिशेने सरकला आहे. ३० वर्षीय सरकारी रोख्यांच्या परताव्यानेही यील्डनेही ५.३ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. यावरून कर्ज घेण्याचा खर्च वाढण्याची आणि व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळतात.
