Uday Kotak Indian Companies Investment: गुगलची पालक कंपनी अल्फाबेटने ८० अब्ज डॉलर्सचे नवीन भांडवल उभारण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे कॉर्पोरेट गुंतवणूक आणि दीर्घकालीन वाढ या विषयांवर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, बँकिंग क्षेत्रातील दिग्गज उदय कोटक यांनी भारतीय कंपन्यांना भविष्यासाठी गुंतवणुकीत वाढ करण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन करताना त्यांनी आयपीएल संपली आता गुंतवणुकीकडे वळा असे म्हटले आहे.
आता आयपीएल संपली…
उदय कोटक यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “रोख रकमेचा प्रचंड साठा (Cash Surplus) असलेल्या गुगलने नुकतीच, अतिरिक्त ८० अब्ज डॉलर्सची भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली आहे. गुगलचा वार्षिक नफा १६० अब्ज डॉलर्स, गेल्या तिमाहीतील नफा ६२ अब्ज डॉलर्स आणि बाजार भांडवल ४.५ ट्रिलियन डॉलर्स इतके आहे. ही रक्कम भारतातील सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या एकत्रित नफ्याच्या आणि बाजार भांडवलाच्या जवळपास आहे. सध्याची परिस्थिती काहीही असली, तरीही भविष्यात गुंतवणूक करावी. सर्व कंपन्यांसाठी ही एक ‘जागृतीची हाक’ (Wake-up call) आहे. आता आयपीएल संपली असल्यामुळे, भारताने पुन्हा एकदा ‘खऱ्या व्यवसायावर’ लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे.”
वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवेचीही गुंतवणूक
सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखालील ‘अल्फाबेट’ कंपनीने, विविध प्रकारच्या इक्विटी ऑफर्सच्या माध्यमातून ८० अब्ज डॉलर्स उभारण्याच्या योजनेची घोषणा केल्यानंतर उदय कोटक यांनी हे भाष्य केले. या निधी उभारणीच्या पॅकेजमध्ये वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवेकडून होणाऱ्या १० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा समावेश आहे. तसेच यात ‘अॅट-द-मार्केट’ शेअर विक्री कार्यक्रम, ‘अंडररिटन’ इक्विटी ऑफरिंग आणि ‘मँडेटरी कन्व्हर्टिबल प्रेफर्ड स्टॉक’ यांचाही समावेश आहे.
कंपनीच्या एका निवेदनानुसार, निधी उभारणीच्या या योजनेत ४० अब्ज डॉलर्सच्या ‘अॅट-द-मार्केट’ (बाजारभावावर आधारित) शेअर्स विक्रीचा समावेश आहे. ज्याअंतर्गत अल्फाबेट तिसऱ्या तिमाहीपासून थेट खुल्या बाजारात आपल्या शेअर्सची विक्री करेल. याव्यतिरिक्त, कंपनी अंडररायटेड शेअर्स विक्री आणि ‘अनिवार्यपणे रूपांतरित होणाऱ्या अग्रहक्क शेअर्स’च्या (Mandatory Convertible Preferred Stock) माध्यमातून ३० अब्ज डॉलर्सचा निधी उभारणार आहे.
एआयसाठी भांडवलाचा नवा मार्ग
मोठ्या सार्वजनिक कंपन्या क्वचितच इतक्या मोठ्या प्रमाणावर इक्विटीद्वारे भांडवल उभारणी करतात. तरीही, AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्राच्या प्रचंड भांडवली गरजांमुळे तंत्रज्ञान कंपन्यांना निधी उभारणीच्या नवीन मार्गांचा शोध घेण्यास भाग पडले आहे. या संपूर्ण क्षेत्रात स्पर्धा तीव्र होत असताना अल्फाबेट ही कंपनी डेटा सेंटर्स, संगणकीय पायाभूत सुविधा आणि AI क्षमतांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे.
