नवी दिल्ली : लोकप्रिय डिजिटल देयक प्रणाली असलेल्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयच्या माध्यमातून सरलेल्या आर्थिक वर्षातील अखेरच्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये २९.५३ लाख कोटी रुपये मूल्याचे व्यवहार पार पडले आहेत. मुख्यतः सणोत्सवाचा काळ आणि आर्थिक वर्षाचा समारोप यामुळे व्यवहार मूल्यात वाढ झाली आहे.
एनसीपीआयच्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात २२.६४ अब्ज असे विक्रमी संख्येने व्यवहार पार पडले आहेत. मार्च २०२६ मधील व्यवहारांचे एकूण मूल्य २९.५३ लाख कोटी रुपये इतके होते; याउलट, गेल्या वर्षी याच महिन्यात हे मूल्य २४.७७ लाख कोटी रुपये राहिले होते. अशा प्रकारे, वार्षिक आधारावर यामध्ये १९ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. फेब्रुवारी महिन्यात यूपीआय व्यवहारांचे एकूण मूल्य २६.८४ लाख कोटी रुपये इतके होते, ज्यामध्ये मासिक आधारावर १० टक्के वाढ दिसून आली.
होळी आणि ईद यांसारखे प्रमुख सण साजरे झालेल्या मार्च महिन्यात, दररोज सरासरी ७३ कोटी व्यवहार झाले आणि या व्यवहारांचे सरासरी दैनिक मूल्य ९५,२४३ कोटी रुपये इतके होते. देशातील डिजिटल देयक परिसंस्थेमध्ये होत असलेली ही सातत्यपूर्ण वाढ, लोकांच्या दैनंदिन कार्यात ‘रिअल-टाइम पेमेंट’ प्रणालींचा झालेला शिरकाव अधोरेखित करते.
आजच्या घडीला, भारतातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी ८५ टक्के व्यवहार हे यूपीआयच्या माध्यमातूनच पार पडतात. याचा प्रभाव केवळ देशाच्या सीमांपुरता मर्यादित नसून, जागतिक स्तरावर होणाऱ्या ‘रिअल-टाइम डिजिटल’ देयकांपैकी जवळपास ५० टक्के व्यवहारांना यूपीआयद्वारेच गती दिली जाते.
यूपीआयचे सीमोल्लंघन
संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरिशस यांसारख्या सात देशांमध्ये यूपीआय सेवा यापूर्वीच सुरू झाली आहे. फ्रान्समध्ये यूपीआय चा झालेला प्रवेश हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो; कारण युरोप खंडामध्ये यूपीआयने टाकलेले हे पहिलेच पाऊल आहे.
