UPI MDR Charges NITI Aayog Ashok Lahiri Statement Details: नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांनी मोठ्या रकमेच्या यूपीआय व्यवहारांवरील ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ शुल्काचे समर्थन केले आहे. व्यावसायिकांनी व्यवसया स्वतःच्या बळावर चालवले पाहिजे, असा युक्तिवाद त्यांनी केला. लाहिरी म्हणाले की, सरकार प्रत्येक व्यवहारासाठी अनिश्चित काळापर्यंत अनुदान देऊ शकत नाही. तसेच, सरकारने खर्च करावा अशी अपेक्षा करण्याऐवजी सेवेचा वापर करणाऱ्यांनीच त्या सेवेच्या खर्चात आपला वाटा उचलला पाहिजे.
प्राचीन भारतीय तत्त्ववेत्ता चाणक्य यांचा दाखला देत लाहिरी म्हणाले, “राजाने नागरिकांकडून अशा प्रकारे कर गोळा केला पाहिजे जशी एखादी मधमाशी फुलातून मध गोळा करते. मधमाशी अतिशय हळुवारपणे, टप्प्याटप्प्याने आणि फुलाच्या पाकळ्यांना कोणतीही इजा न पोहोचवता किंवा त्या न चुरगळता मघ गोळा करते.”
आपली ही मते नीती आयोगाची अधिकृत भूमिका नाही हे स्पष्ट करत लाहिरी म्हणाले, “यूपीआयबाबत बोलायचे झाल्यास, ही नीती आयोगाची अधिकृत भूमिका नाही. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. माझे असे मत आहे की, कोणताही व्यवसाय असो किंवा कोणताही व्यवहार, त्याचे शुल्क वापरकर्त्यानेच दिले पाहिजे.”
लाहिरी यांनी यूपीआय शुल्काची तुलना इतर बँकिंग सेवांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काशी केली आणि असा युक्तिवाद केला की, मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी हा खर्च तुलनेने कमी असेल.
“आकडेवारीकडे पहा. हे १०० रुपयांच्या व्यवहाराबाबत आहे. १०० रुपयांच्या व्यवहारासाठी तुम्ही ४० पैसे मोजता. तेही मोठ्या व्यवहारांच्या बाबतीत. यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होणार आहे का? नाही. पण व्यवसाय चालवताना ते स्वबळावर चालवणे गरजेचे असते. तुम्हाला याची सवय होईल”, असे लाहिरी म्हणाले.
त्यांनी बँकिंग सेवेचे उदाहरण म्हणून ‘चेक बुक्स’चा उल्लेख केला, ज्यासाठी ग्राहकांना किरकोळ शुल्क द्यावे लागते. “उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही बँकेकडून चेक बुक्स घेता, तेव्हा त्यासाठी थोडी रक्कम मोजता. त्यामुळे तुम्हाला काही त्रास होतो का? हा व्यवसायाचाच एक भाग आहे”, असे लाहिरी म्हणाले.
‘मर्चंट डिस्काउंट रेट’ म्हणजे नेमके काय?
‘मर्चंट डिस्काउंट रेट’ हे डिजिटल पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुकानदारांकडून आकारले जाणारे एक शुल्क आहे. यूपीआय व्यवहार पूर्ण करणाऱ्या बँका आणि इतर पेमेंट प्रोव्हायडर्स यांच्यात हे शुल्क वाटून घेतले जाते. उदाहरणार्थ, क्रेडिट कार्डच्या वापरावर एकूण व्यवहाराच्या १ ते ३ टक्के, तर डेबिट कार्डवर ०.९ टक्क्यांपर्यंत ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ शुल्क आकारले जाते. मात्र, कार्ड पेमेंटच्या तुलनेत यूपीआय व्यवहारावर जानेवारी २०२० पासून ‘झिरो एमडीआर’ लागू आहे. महत्वाची बाब म्हणजे, असा कोणताही नियम लागू झाल्यास तो व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) व्यवहारांवर लागू होणार नाही. याचाच अर्थ तुम्ही एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला २,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली तरी त्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
