UPI Transaction Charge NPCI Merchant Discount Rate Pune Reaction: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) १५ सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे, व्यापाऱ्यांना यूपीआयद्वारे २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे पेमेंट स्वीकारताना ०.४ टक्के शुल्क भरावे लागेल, अशी घोषणा केली आहे. १५ ऑक्टोंबरपासून लागू होणाऱ्या या शुल्काबाबत आता व्यापाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. यावर प्रतिक्रिया देताना पुण्यातील काही व्यावसायिकांनी शुल्क लागणार असेल तर ऑनलाइन पेमेंट स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

उधारीवर धंदा करू पण यूपीआय नको…

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या २ हजार रुपयांवरील व्यहारांवर शुल्क लागू करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना पुण्यातील मेडिकल व्यावसायिक अमोल पारसवार म्हणाले, “या क्षेत्रात खूप स्पर्धा आहे. ८० टक्के मेडिकल दुकानदार खूप कमी मार्जिनवर व्यवसाय करत आहेत. काल रात्री या निर्णयाबाबत कळाले. आज सकाळपासून याचाच विचार सुरू आहे की, आता यातून मार्ग कसा काढायचा. कारण ग्राहकाला दिले जाणारे डिस्काउंट मर्चंट डिस्काउंट रेटचे शुल्क यामुळे व्यवसाय करणे कठीण होईल. ओळखीचे आणि नियमीत ग्राहक आहेत त्यांना दुखावू शकत नाहीत. त्यामुळे बिल स्वीकारताना त्यांना एकतर नंतर रोख रक्कम आणूण देण्याचा किंवा चेकचा पर्याय द्यावा लागणार आहे.”

ग्राहकांची गैरसोय

“२ हजार रुपयांवरील मर्चंट डिस्काउंट रेट शुल्क सरसकट सर्वच व्यापाऱ्यांसाठी नसले तरी, यामुळे छोट्या व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अजूनही काही छोट्या व्यापाऱ्यांनी पूर्णपणे यूपीआयचा स्वीकार केलेला नाही. अशात या निर्णयामुळे आणखी शंका निर्माण होतील. परिणामी ग्राहकांची रोख रकमेसाठी अडवणूक होईल”, अशी प्रतिक्रिया नाव न सांगण्याच्या अटीवर एका निवृत्त बँक अधिकाऱ्याने दिली.

लोकसभेत कायद्यात दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली तेव्हा जी शंका व्यक्त केली होती, ती अखेर खरी ठरली. आता दोन हजार रुपयांच्या पेमेंट्सवर कमिशन आकारले जाईल. एकतर व्यापारी आणि अखेर ग्राहक यांना ती वाढीव किंमत मोजावी लागेल, अन्यथा लोक यूपीआयशिवाय आपले व्यवहार करतील. यातील दुसरी शक्यताच जास्त आहे. डिजिटल फायनान्स, डिजिटल बँकिंग, डिजिटल इकॉनॉमी, डिजिटल इंडिया या फक्त घोषणा उरतील. यामुळे डिजिटल व्यवहारात खूप मोठी पिछेहाट होण्याची शक्यता आहे.

-देविदास तुळजापूरकर, माजी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र

मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजे काय?

मर्चंट डिस्काउंट रेट म्हणून ओळखले जाणारे हे शुल्क प्रति व्यवहार जास्तीत जास्त ३०० रुपयांपर्यंत मर्यादित असेल. याचाच अर्थ असा की, जर एखाद्या व्यापाऱ्याला ग्राहकाने यूपीआयद्वारे ७५,००० रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे पेमेंट केले, तरीही मर्चंट डिस्काउंट रेट शुल्क ३०० रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.

मर्चंट डिस्काउंट रेट हे डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यापाऱ्यांनी भरायचे शुल्क आहे. प्रमाणित दरानुसार, ३,००० रुपयांच्या खरेदीवर १२ रुपये शुल्क आकारले जाईल, तर ५०,००० रुपयांच्या व्यवहारासाठी २०० रुपये खर्च येईल. १ लाख रुपयांच्या पेमेंटवर ३०० रुपयांचे कमाल शुल्क आकारले जाईल.

दरम्यान, रेल्वे, दूरसंचार सेवा, विमा आणि इंधन यांसारख्या विशिष्ट श्रेणींमधील व्यापाऱ्यांना केलेल्या २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर, प्रति व्यवहार ५ रुपये इतके निश्चित मर्चंट डिस्काउंट रेट शुल्क आकारले जाईल.

ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा

दरम्यान, ग्राहकांसाठी यूपीआय व्यवहार पूर्णपणे नि:शुल्क राहणार आहेत. त्यामुळे मित्र, कुटुंबीय किंवा स्वत:च्याच दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठवणे पूर्वीप्रमाणे मोफत असणार आहे. यूपीआय ॲप्सना व्यवहारांवर प्लॅटफॉर्म फी किंवा इतर कोणतेही शुल्क आकारण्यास मनाई आहे.

‘पर्सन-टू-मर्चंट’ या श्रेणीतील व्यवहारांवर छोट्या व्यापाऱ्यांसाठी मर्चंट डिस्काउंट रेट शून्य राहील. या श्रेणीमध्ये अशा लहान विक्रेत्यांचा समावेश होतो जे यूपीआय क्यूआरद्वारे थेट त्यांच्या खात्यात दरमहा १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारतात. २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचा एखादा व्यवहार झाला तरीही ही सवलत रद्द होणार नाही. मात्र, जे व्यापारी सलग तीन महिने दरमहा १ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम स्वीकारतील, त्यांना ‘पर्सन-टू-मर्चंट’ श्रेणीमध्ये समाविष्ट केले जाईल. म्हणजेच त्यांना तिथून पुढे मर्चंट डिस्काउंट रेट शुल्क आकारले जाईल.

दरवाढ करावी लागेल

१ लाख रुपयाच्या मर्यादेबाबत बोलताना पुण्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले की, “हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या गॅस, साखर, भाज्या यासारख्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशातच आता जर यूपीआयद्वारे पैसे स्वीकारण्यावरही शुल्क लागणार असले तर धंदा करणे कठीण होईल. हा सर्व खर्च आम्ही उचलू शकत नाही. परिणामी ग्राहक नाराज झाले तरीही आम्हाला दरवाढ करणे भाग पडेल.”