UPI Transaction Charges Rules : यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागणार की नाही? या प्रश्नावर केंद्र सरकारने एक नवीन राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये २००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांना ‘शुल्क-मुक्त’ इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धती म्हणून निश्चित करण्यात आले आहे. ‘पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स ॲक्ट, २००७’ च्या कलम १०ए अन्वये, केंद्र सरकारने बँका आणि प्रणाली पुरवठादारांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. या नियमानुसार, रुपे डेबिट कार्ड किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे २,००० रुपयांपर्यंतचे व्यवहार करणाऱ्या किंवा स्वीकारणाऱ्या व्यक्तींवर कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क आकारता येणार नाही.

२००० रुपयांवरील व्यवहारांवर शुल्क लागणार?

नवीन निर्णयानुसार, ग्राहकांसाठी किंवा पैसे स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी २,००० रुपयांपर्यंतचे यूपीआय आणि रुपे व्यवहार पूर्णपणे निशुल्लक राहतील. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स ॲक्ट, २००७ मधील कलम १०ए च्या अधिकारांचा वापर करून हा नियम लागू करण्यात आला आहे. कोणतीही बँक किंवा पेमेंट सिस्टीम प्रोव्हायडर या व्यवहारांवर थेट किंवा अप्रत्यक्ष शुल्क लादू शकत नाही. मात्र, २००० रुपयांवरील व्यवहारांवर शुल्क लागणार का? यावर सरकारने स्पष्टीकरण दिलेले नाही.

एमडीआर आणि डिजिटल पायाभूत सुविधा

सध्या सर्व प्रकारचे यूपीआय व्यवहार पूर्णपणे शुल्कमुक्त आहेत. मात्र, यासाठी सेवा पुरवठादार कंपन्या आणि सरकारला याचा सर्व खर्च उचलावा लागत आहे. परिणामी नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी यावर शुल्क लावणे आवश्यक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले की, हा निर्णय भारताची डिजिटल पेमेंट पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी हे आवश्यक आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?

गेल्या महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले होते की, डिजिटल व्यवहारांवरील मर्चंट डिस्काउंट रेट हा ग्राहकांसाठी नसून काही ठराविक मर्यादेपत्राच्या व्यवहारांसाठी व्यापाऱ्यांवर लागू होतो. यामुळे मिळणाऱ्या महसुलामुळे बँक आणि फिनटेक कंपन्यांना डिजिटल सुरक्षेमध्ये आणि पायाभूत सुविधांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास मदत होईल. मात्र, सर्वसामान्य ग्राहकांसाठी आणि व्यक्ती-ते-व्यक्ती होणारे डिजिटल व्यवहार पूर्णपणे मोफत राहतील, असा पुनरुच्चार सरकारने केला आहे.