UPI Transactions September Drop : देशातील डिजिटल व्यवहारांसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयवरील व्यवहारांच्या संख्येत सप्टेंबरमध्ये ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत १.८ टक्क्यांची घट झाली. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये यूपीआयच्या माध्यमातून २,४०७ कोटी व्यवहार झाले. ऑगस्टमध्ये ही संख्या २,४५० कोटी होती.

यूपीआय व्यवहारांचे एकूण मूल्यही सप्टेंबरमध्ये १.५ टक्क्यांनी घटून २९.३७ लाख कोटी रुपयांवर आले. ऑगस्टमध्ये हे मूल्य २९.८२ लाख कोटी रुपये होते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) या प्रणालीचे संचालन करते. दरम्यान, सप्टेंबरमध्ये व्यवहारांच्या संख्येत मासिक घट दिसत असली तरी दिवसाला होणाऱ्या सरासरी व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये ३१ दिवस असल्याने त्या महिन्यात एकूण व्यवहारांची संख्या तुलनेने अधिक राहिली. सप्टेंबरमध्ये ३० दिवस असल्यामुळे एकूण व्यवहार कमी दिसत आहेत. सप्टेंबरमध्ये दररोज सरासरी ८०.२ कोटी यूपीआय व्यवहार झाले, तर ऑगस्टमध्ये हा आकडा ७९.१ कोटी होता.

यूपीआयवरील मोठ्या मूल्याच्या व्यापारी व्यवहारांसाठी नव्या व्यापारी सवलत दराची (एमडीआर) अंमलबजावणी होण्याच्या सुमारे दोन आठवडे आधी ही आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे.

आयएमपीएस व्यवहारही

एनपीसीआयद्वारे चालविल्या जाणाऱ्या इमिजिएट पेमेंट सर्व्हिसेस (आयएमपीएस) प्रणालीवर सप्टेंबरमध्ये ३५.४० कोटी व्यवहार झाले. या व्यवहारांचे एकूण मूल्य ७.०५ लाख कोटी रुपये होते. रिझर्व्ह बँकेच्या रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) प्रणालीवर सप्टेंबरमध्ये ३.२५ कोटी व्यवहार झाले. या व्यवहारांचे एकूण मूल्य २३५.७१ लाख कोटी रुपये होते.