US Economy Inflation: डोनाल्ड ट्रम्प यांची जागतिक पातळीवरील आक्रमक धोरणे, टॅरिफच्या धमक्या आणि युद्धजन्य चर्चा यामुळे जागतिक राजकारण ढवळून निघाले असताना, दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेत मात्र सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.
सप्टेंबर महिन्यातील ताज्या रोजगार आणि महागाईच्या आकडेवारीने अमेरिकन नागरिकांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा ठाकल्याचे समोर आणले आहे. ट्रम्प यांच्या जागतिक घडामोडींमधील दबदब्यापेक्षा देशातील वाढती महागाई आणि थंडावलेला पगारवाढीचा दर यामुळे अमेरिकेतील सर्वसामान्य नागरिक सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.
अमेरिकेतील सप्टेंबर महिन्यातील रोजगाराविषयक अहवालातून ग्राहकांना भेडसावणाऱ्या एका मोठ्या समस्येचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पगारातील वाढ आणि महागाईचा दर यांच्यातील दरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
कामगार विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सरासरी ताशी पगारात मासिक आधारावर केवळ ०.१ टक्क्यांची अत्यल्प वाढ झाली आहे, तर वार्षिक आधारावर ही वाढ ३ टक्के इतकी आहे. ही स्थिती अशा वेळी दिसून आली आहे जेव्हा महागाईच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टपर्यंतच्या काळात वस्तूंच्या किमती ३.४ टक्के दराने वाढत होत्या.
“एप्रिलपासून महागाईने सामान्य कामगारांच्या पगारात झालेली सर्व वाढ गिळंकृत केली आहे. सध्या अनेक लोकांना काय खरेदी करायचे आणि कशात काटकसर करायची याबाबत कठीण निर्णय घ्यावे लागत आहेत”, असे नेव्ही फेडरल क्रेडिट युनियनच्या मुख्य अर्थतज्ज्ञ हेदर लाँग यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले आहे.
“महत्त्वाची बाब म्हणजे, सप्टेंबर महिन्यात वेतनात केवळ ०.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२५ नंतरची ही सर्वात कमी मासिक वाढ होती”, असे त्यांनी पुढे म्हटले.
“या महिन्यातील निराशाजनक स्थिती असूनही, २०२६ मधील श्रम बाजारातील घडामोडींबाबत मी सर्वसाधारणपणे खूप सकारात्मक आहे”, असे ‘ॲक्सेस-मॅक्रो’मधील श्रम बाजारविषयक वरिष्ठ सल्लागार गाय बर्जर यांनी ‘एक्स’वर लिहिले.
गुंतवणूकदार मालामाल
एकीकडे महागाईमुळे अमेरिकन नागरिक चिंतेत असताना, गुंतवणूकदारांमध्ये मात्र मोठा उत्साह पाहायल मिळत आहे. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारातील निर्देशांक वाढीसह बंद झाले. यामध्ये ‘नॅस्डॅक १००’ निर्देशांकाने सर्वकालीन उच्चांक गाठला.
प्रमुख निर्देशांकांमध्ये ‘नॅस्डॅक कंपोझिट’ने १.१९% ची सर्वाधिक वाढ नोंदवली. मात्र, व्यवहारादरम्यान त्याने सर्वकालीन उच्चांक गाठल्यानंतर अखेरीस तो त्या पातळीच्या खाली बंद झाला. ‘एस अँड पी ५००’ निर्देशांकानेही या तेजीमध्ये सहभाग नोंदवला, तरीही तो त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च बंद पातळीपेक्षा साधारण १% खालीच आहे.
