Donald Trump net worth and Truth Social stock crash: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने दमदार विजय मिळवला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या या विजयामुळे रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रूथ सोशलची पालक कंपनी ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपच्या शेअर्समध्ये बाजार उघडल्याबरोबर झपाट्याने घसरण झाली. यामुळे सुरुवातीच्या व्यवहारात ट्रम्प यांच्या एकूण संपत्तीमध्ये अंदाजे ६४६ कोटी रुपयांची (७३ दशलक्ष डॉलर) घट झाली. डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्हींवर पुन्हा नियंत्रण मिळवल्याने ट्रम्प यांच्या निर्णय घेण्याच्या अधिकारांवर मर्यादा येणार असल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केली.

ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप

ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप शेअर्समध्ये ११ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण होऊन ते प्रति शेअर ५.२३ डॉलरच्या विक्रमी इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचले. यामुळे शेअरमधील मागील सत्रातील वाढ नाहीशी झाली. हा शेअर या वर्षात आतापर्यंत ५५ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे.

ट्रम्प मीडियासाठी आधीच कठीण असलेल्या आर्थिक काळात ही विक्री दिसून येत आहे. कंपनीने २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत २३८.१ दशलक्ष डॉलर्सचा निव्वळ तोटा नोंदवला, तर महसूल केवळ १.७ दशलक्ष डॉलर्स इतका होता. या तोट्यामागे प्रामुख्याने डिजिटल मालमत्तेवरील न-वसूल झालेले नुकसान आणि कायदेशीर शुल्कांचा मोठा वाटा आहे. याव्यतिरिक्त सप्टेंबरपर्यंत ट्रुथ सोशलवरील वेब ट्रॅफिकमध्ये वार्षिक आधारावर सुमारे ३० टक्क्यांनी घट झाली आहे.

क्रिप्टो होल्डिंग्ज

वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलशी संबंधित डिजिटल टोकन्सवरही मध्यावधी निवडणुकीच्या निकलामुळे घसरणीचा दबाव आला. हा क्रिप्टो उपक्रम ट्रम्प यांच्या कुटुंबासोबत सुरू करण्यात आला होता.

ट्रम्पना निधी देणाऱ्या कंपन्याही घसरल्या

निवडणुकीच्या निकालांचे पडसाद निवडणूक निधी देणाऱ्या प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांवरही उमटले. ट्रम्प यांचे प्रमुख देणगीदार इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला आणि स्पेसएक्सचे शेअर्स घसरले.