US Midterm Election Results 2026 Impact On Indian Stock Market: डेमोक्रॅटिक पक्षाने २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवले आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पारंपारिकपणे रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव असलेल्या राज्यांमध्ये मिळालेल्या या दणदणीत विजयामुळे वॉशिंग्टनमधील सत्तेचे संतुलन बदलले असून, ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शेवटच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या विधिविषयक अजेंड्यावर दबाव निर्माण झाला आहे. अमेरिकेतील या निकालाचा भारतीय शेअर बाजार, कच्च्या तेलाच्या किमती आणि टॅरिफ यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा घेउया.

भारतीय शेअर बाजार

भारताच्या दृष्टीने या निकालाचे परिणाम थेट शेअर बाजारापेक्षा भू-राजकीय स्वरूपाचे असण्याची शक्यता अधिक आहे. रोख्यांवरील परतावा, डॉलरचे मूल्य किंवा कच्च्या तेलाच्या किमतींत घट होणे भारतासाठी आणि देशांतर्गत मालमत्तांसाठी फायदेशीर ठरेल. मात्र ट्रम्प यांनी टॅरिफ वाढ केल्यास किंवा भू-राजकीय अनिश्चितता वाढल्यास भारतावर दबाव येऊ शकतो.

अमेरिकेसोबतचा भारताचा व्यापार करारही अद्याप मार्गी लागलेला नाही. एमके ग्लोबलच्या मते, “कोणताही ठोस करार होण्याची शक्यता तीन महिन्यांपूर्वी जितकी कमी होती, तितकीच आजही आहे. मध्यावधी निवडणुकीच्या निकालांमुळे यात फारसा बदल झालेला नाही.”

अमेरिकन डॉलर कमकुवत होणे आणि अमेरिकन सरकारी रोख्यांवरील परतावा कमी होणे भारतासाठी सकारात्मक आहे, कारण यामुळे रुपयावरील दबाव कमी होऊ शकतो, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन सुधारू शकतो आणि कर्ज घेण्याचा खर्चही कमी होऊ शकतो.

पण, केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी या विजयाचे स्वरूप अत्यंत महत्त्वाचे आहे. हा विजय इतका निर्णायक आहे की, तो २०२८ मध्ये होणाऱ्या पुढील अध्यक्षीय निवडणुकीत सत्तांतराची शक्यता दर्शवणारा आहे.

कच्च्या तेलाच्या किमती

संपूर्ण जगाचे लक्ष सघ्या कच्च्या तेलाच्या किमतींवर आहे. कारण अशी अपेक्षा आहे की डेमोक्रॅटिक काँग्रेस राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर इराण संघर्षातून माघार घेण्यासाठी दबाव आणू शकते, ज्यामुळे तेलाच्या किमतींना काहीसा दिलासा मिळेल. पण, याला आव्हान दिले जाऊ शकते. कारण ऐतिहासिकदृष्ट्या ट्रम्प यांनी काँग्रेसच्या आदेशाकडे कधीही लक्ष दिले नाही, उलट त्यांनी आपले निर्णय लागू करण्यासाठी अनेकदा कार्यकारी आदेश आणि आणीबाणीच्या अधिकारांचा वापर केला आहे.

टॅरिफ

डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व असलेली काँग्रेस आता ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांची अधिक बारकाईने तपासणी करेल आणि कायद्याद्वारे त्यांच्या अंमलबजावणीला आव्हानही देऊ शकेल. मात्र व्यापार धोरणाबाबत ट्रम्प यांच्याकडे अजूनही महत्त्वाचे कार्यकारी अधिकार असतील. याचा अर्थ असा की, टॅरिफ त्वरित मागे घेतले जाण्याची शक्यता नाही. जागतिक पुरवठा साखळीशी संबंधित कंपन्या, तसेच उत्पादन खर्च आणि आयात केलेल्या कच्च्या मालावर अवलंबून असलेल्या व्यवसायांसाठी, ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे.