US Stock Market Rally Retirement Trend: अमेरिकेत ज्येष्ठ कर्मचारी मोठ्या प्रमणावर नोकऱ्या सोडत असल्याचे समोर आले आहे. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजच्या एका नवीन अहवालानुसार, शेअर बाजारातील तेजीमुळे निर्माण झालेली संपत्ती हे यामागचे एक मुख्य कारण असू शकते. ५५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांचा श्रमशक्ती सहभागाचा दर (Labor force participation rate) कोरोना महामारीपासून घसरलेला आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये, म्हणजेच महामारी अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वी, ५५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांचा अमेरिकेतील श्रमशक्ती सहभागाचा दर ४०.३% होता. तो जुलै २०२६ मध्ये तो घसरून ३६.९% वर आला आहे.

“आम्हाला वाटते की, याचा संबंध गेल्या दोन वर्षांत अमेरिकन शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक S&P 500 मध्ये झालेली ३५ टक्क्यांहून अधिक वाढ याच्याशी आहे”, असे बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजमधील अर्थतज्ज्ञ आदित्य भावे यांनी सांगितल्याचे वृत्त याहू फायनान्सने दिले आहे.

या तेजीमुळे, नोकरीतून कधी निवृत्त व्हायचे याबद्दल विचार करणाऱ्या अनेक लोकांसाठी निवृत्तीचा निर्णय घेणे कदाचित सोपे झाले असावे.

“कामगार-विषयक आकडेवारीमध्ये एक पेच दिसून येत आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता, महामारीनंतर बहुतेक निर्देशकांमध्ये खूप चांगली सुधारणा झाली आणि ती आमच्या अपेक्षांपेक्षा कितीतरी अधिक वेगाने झाली. मात्र, या सुधारणेच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपैकी एक म्हणजे वयोवृद्ध कामगारांचा श्रमशक्तीतील सहभाग. गेल्या काही महिन्यांत या सहभागाच्या प्रमाणात आणखी घट झाली आहे”, असे भावे म्हणाले.

“मला वाटत नाही की यामागे एखादेच विशिष्ट कारण असू शकते. पण गेल्या काही वर्षांत आणि विशेष म्हणजे २०२० पासून S&P 500 निर्देशांकात दुप्पट वाढ झाली आहे. शेअर बाजारातील कामगिरी पाहता, संपत्तीत झालेली ही वाढ काही लोकांना निवृत्ती घेण्यास नक्कीच प्रोत्साहित करणारी आहे. कारण त्यांना असे वाटू लागेल की, ‘आता मला काम करण्याची गरज नाही’. यामुळे लोकांना आपण निवृत्त होऊ शकतो, असा मोठा आत्मविश्वास मिळतो. जे लोक जोखीम पत्करायला फारसे उत्सुक नसतात, त्यांच्यासाठीही यामुळे पुरेशी आर्थिक सुरक्षितता निर्माण झाली आहे,” असे त्यांनी नमूद केले.

निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या ग्राहकांसोबत काम करणाऱ्या आर्थिक सल्लागारांना या विश्लेषणाचे कोणतेही आश्चर्य वाटले नाही.

“संपत्तीचा हा प्रभाव वास्तव आहे. २०२३, २०२४ आणि २०२५ या वर्षांत बाजारातून दुहेरी अंकी परतावा मिळाला आहे आणि २०२६ मध्येही अशीच स्थिती राहण्याची चिन्हे आहेत. या नफ्यामुळेच निवृत्ती शक्य होत आहे. यामुळे माझ्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक पर्याय उपलब्ध होत आहेत”, असे असे ‘वुमन अँड वेल्थ’ या पुस्तकाच्या लेखिका आणि आर्थिक व्यवस्थापक कॅरी कार्बोनारो यांनी सांगितले.