Vaibhav Suryavanshi Earning And Tax: यंदाची आयपीएल गाजावणाऱ्या वैभव सूर्यवंशीने केवळ १५ वर्षांच्या वयातच आयपीएल करार, स्पर्धांमधील बक्षिसे, प्रायोजकत्व आणि जाहिरात करार यांच्या माध्यमातून सुमारे ७ कोटी रुपयांची संपत्ती कमावली असल्याचे वृत्त आहे. त्याच्या या कमाईमुळे एका महत्त्वाच्या आर्थिक प्रश्नाकडेही सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. तो प्रश्न म्हणजे, अल्पवयीन मुलांनी कमावलेल्या उत्पन्नावर आयकर विभाग नेमका कोणाकडून कर आकारतो?
भारतीय कर कायद्यांनुसार, १८ वर्षांखालील व्यक्तीला ‘अल्पवयीन’ मानले जाते. अल्पवयीन व्यक्ती विविध स्रोतांतून उत्पन्न मिळवू शकत असली, तरी त्यांच्यावरील कर आकारणीचे नियम हे प्रौढांना लागू होणाऱ्या नियमांपेक्षा वेगळे असतात. बहुतांश प्रकरणांमध्ये, अल्पवयीन व्यक्तीच्या उत्पन्नावर स्वतंत्रपणे कर आकारला जात नाही. उत्पन्नाचे एकत्रीकरण (Clubbing of Income) या तरतुदींनुसार, हे उत्पन्न त्यांच्या पालकांच्या उत्पन्नामध्ये समाविष्ट केले जाते.
उत्पन्न एकत्रीकरण
आयकर कायद्याच्या कलम ६४(१अ) नुसार, एखाद्या अल्पवयीन मुलाला प्राप्त होणारे किंवा त्याच्या नावे जमा होणारे कोणतेही उत्पन्न हे सामान्यतः पालकांच्या उत्पन्नात समाविष्ट केले जाते आणि त्यावर, ते पालकांचेच स्वतःचे उत्पन्न आहे, अशा प्रकारे कर आकारला जातो.
अल्पवयीन मुलांना अनेकदा खालील स्रोतांद्वारे उत्पन्न प्राप्त होते:
- बचत बँक खाती
- मुदत ठेवी
- पालकांनी किंवा कायदेशीर पालकांनी त्यांच्या नावे केलेल्या गुंतवणुकी
- भेटी आणि उत्पन्न मिळवून देणाऱ्या इतर आर्थिक मालमत्ता
उत्पन्न एकत्रीकरण तरतुदीचा उद्देश हा करदात्यांनी, उत्पन्न-निर्मिती करणाऱ्या मालमत्ता आपल्या मुलांना हस्तांतरित करून, आपली कर-दायित्वे कमी करण्यापासून त्यांना रोखणे हा आहे.
सवलत
आयकर कायद्यातील कलम १०(३२) अंतर्गत काही प्रकरणांमध्ये मर्यादित दिलासा दिला जातो. जर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीचे उत्पन्न वर्षाला १५०० रुपयांपेक्षा कमी असेल, तर ते उत्पन्न करमुक्त ठरते. ज्या उत्पन्नाचे एकत्रिकरण पालकांच्या उत्पन्नामध्ये केली जाते, अशा वेळी पालक प्रत्येक अल्पवयीन मुलासाठी १५०० रुपयांची सवलत मागू शकतात.
ज्या ठिकाणी अल्पवयीन व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न १,५०० रुपयांपेक्षा जास्त असते, तिथे केवळ १५०० रुपयांचीच सवलत म्हणून मागणी करता येते. तर उर्वरित उत्पन्नावर कर आकारला जातो.
उत्पन्न एकत्रिकरणाचे नियम
दोन्ही पालक कमावते असल्यास
जर आई आणि वडील या दोघांचेही उत्पन्न करपात्र असेल, तर अल्पवयीन मुलाचे उत्पन्न त्या पालकाच्या उत्पन्नाबरोबर एकत्र केले जाते, ज्याचे उत्पन्न अधिक असते.
पालकांचा घटस्फोट झाला असल्यास
घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये, अल्पवयीन मुलाचे उत्पन्न त्या पालकाच्या उत्पन्नाशी जोडले जाते, ज्याच्याकडे त्या मुलाचा ताबा आहे.
दोन्ही पालकांचे निधन झाले असल्यास
जर दोन्ही पालक हयात नसतील, तर अल्पवयीन मुलाचे उत्पन्न त्याच्या पालकाच्या (Guardian) उत्पन्नाशी जोडले जात नाही. त्याऐवजी, ‘प्रतिनिधी करदाता’ (Representative Assessee) म्हणून कार्य करणाऱ्या पालकामार्फत, त्या अल्पवयीन मुलाच्या वतीने एक स्वतंत्र आयकर विवरणपत्र (Income Tax Return) दाखल केले जाते.
अपवाद
अल्पवयीन मुलांचे बहुतेक उत्पन्न पालकांच्या उत्पन्नामध्ये समाविष्ट केले जात असले तरी, यात काही अपवाद आहेत.
प्रतिभा, कौशल्य किंवा विशेष ज्ञान
जेव्हा एखादे मूल वैयक्तिक प्रयत्न, प्रतिभा, प्राविण्य, विशेष ज्ञान किंवा शारीरिक श्रमातून उत्पन्न मिळवते, तेव्हा ते उत्पन्न अल्पवयीन मुलासाठी करपात्र असते आणि ते पालकांच्या उत्पन्नामध्ये समाविष्ट केले जात नाही.
उदाहरणे:
- व्यावसायिक खेळांमधील कमाई
- अभिनय आणि मॉडेलिंगमधील कामे
- गायन आणि सादरीकरण कला
- कंटेंट क्रिएशन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग
- ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रायोजकत्व
- रिॲलिटी शो आणि स्पर्धा
उदाहरणार्थ, मास्टरशेफ ज्युनियरचा विजेता, बालकलाकार, तरुण क्रिकेटपटू किंवा स्वतःच्या क्षमतेतून कमाई करणारा सोशल मीडिया क्रिएटर यांना सामान्यतः स्वतंत्र आयकर विवरणपत्र दाखल करणे आवश्यक असते.
कर तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे उत्पन्न हे पालकांनी हस्तांतरित केलेल्या मालमत्तेतून नव्हे, तर अल्पवयीन व्यक्तीच्या स्वतःच्या कौशल्यांतून आणि प्रयत्नांतून निर्माण होत असल्याने, ते स्वतंत्र कर आकारणीस पात्र ठरते.
वैभव सूर्यवंशीच्या उत्पन्नावर वेगळ्या पद्धतीने कर का आकारला जाईल?
वैभव सूर्यवंशीचे उत्पन्न हे त्याचे क्रिकेट कौशल्य, स्पर्धांमधील कामगिरी, आयपीएल करार आणि जाहिरात करारांतून मिळालेले आहे. हे उत्पन्न त्याच्या वैयक्तिक प्रतिभेतून आणि व्यावसायिक प्रयत्नांतून मिळत असल्यामुळे, ते उत्पन्न एकत्र करण्याच्या तरतुदींना असलेल्या अपवादांच्या कक्षेत येते.
परिणामी, केवळ १५ वर्षांचा असूनही, त्याचे उत्पन्न त्याच्या स्वतःच्याच नावे करपात्र ठरते. ते त्याच्या पालकांच्या उत्पन्नामध्ये समाविष्ट केले जाणार नाही. क्रीडा, मनोरंजन, कंटेंट क्रिएशन किंवा इतर कौशल्य आधारित उपक्रमांतून कमाई करणाऱ्या इतर प्रतिभावान अल्पवयीन व्यक्तींनाही हाच नियम लागू होतो.
