Singhitarai explosion tragedy : छत्तीसगडमधील शक्ती जिल्हा मंगळवारी भीषण स्फोटाने हादरला. वेदांता समूहाच्या ‘प्रशांत पॉवर लिमिटेड’ (सिंगीतराई प्लांट) मध्ये मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास बॉयलरची पाईपलाईन फुटल्याने ही घटना घडली. या अपघातात आतापर्यंत १४ कामगारांचा मृत्यू झाला असून, ३३ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट इतका भीषण होता की, घटनास्थळावरून धुराचे लोट कित्येक किलोमीटर दुरून दिसत होते. या घटनेवर पहिल्यांदाच वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, प्लांटमधील युनिट-१ च्या बॉयलरमधून अतिउष्ण वाफ वाहून नेणारी पाईपलाईन अचानक फुटली. या अपघातावेळी काही कामगार जवळच जेवण करत होते. ६०० अंश सेल्सिअस तापमान असलेली वाफ अंगावर आल्याने कामगारांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट एखाद्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्यासारखा वाटला.
अनिल अग्रवाल यांच्याकडून शोक व्यक्त
वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “छत्तीसगडमधील अपघाताने मला प्रचंड वेदना झाल्या आहेत. बाधित झालेला प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबाचा भाग आहे. तुमचे अश्रू आणि वेदना माझ्या स्वतःच्या आहेत. या प्रकरणाची सखोल अंतर्गत चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल.”
अपघातग्रस्तांना मदतीची घोषणा
वेदांता समूहाने मृतांच्या कुटुंबांना ३५ लाख रुपये, जखमींना १५ लाख रुपये, उपचारांचा संपूर्ण खर्च आणि मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली असून ‘कायदेशीर चौकशी’चे आदेश दिले आहेत.
घटनेनंतर प्लांट बंद
शक्ती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमृत विकास तोपनो यांनी सांगितले की, जखमींना तात्काळ रायगड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “आमचे पहिले प्राधान्य कामगारांचे प्राण वाचवणे आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देणे हे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर वेदांताने आपला प्लांट तूर्तास बंद ठेवला असून चौकशी समिती नेमली आहे.
