मुंबई: खासगी जीवनविमा कंपनी असलेल्या एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या संचालक मंडळाने मंगळवारी, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विभा पाडळकर यांच्या फेरनियुक्तीस मंजुरी दिली. १२ सप्टेंबरपासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची ही नियुक्ती आहे.

कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांकडून मिळालेल्या मंजुरीनंतर आणि ‘इर्डा’ या नियामकांकडून आवश्यक ती परवानगीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. २००८ मध्ये कंपनीत रुजू झाल्यापासून, पाडळकर या एचडीएफसी लाइफची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने विविध व्यावसायिक चक्रांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. हे एकाग्र धोरण, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि शाश्वत वाढीवर दिला गेलेला भर यामुळे शक्य झाले आहे, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कंपनीची आर्थिक संरचना बळकट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तसेच २०१७ मध्ये कंपनीच्या समभागांची शेअर बाजारात यशस्वी सूचिबद्धतेतही त्यांचा मोलाचा वाटा राहिला.पाडळकर या १९९२ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंग्लंड अँड वेल्सच्या सदस्य बनल्या आणि पात्र सनदी लेखापाल म्हणून त्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्याही सदस्य आहेत. त्या ‘जीवन विमा परिषदे’च्या कार्यकारी समितीच्या सदस्य राहिल्या आहेत आणि उद्योग-स्तरीय उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. पाडळकर यांनी आजवरच्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार आणि प्रतिष्ठित सन्मान प्राप्त केले आहेत.