Anand Mahindra And Vijay Kedia X Post: ज्येष्ठ गुंतवणूकदार विजय केडिया यांनी ‘महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया’मध्ये धोरणात्मक बदल करण्याची गरज असल्याचे भाष्य केले आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीयांना परदेश प्रवास टाळण्यासाठी प्रोत्साहित करत असताना, या कंपनीसमोर भारताच्या देशांतर्गत पर्यटन बाजारपेठेत एक मोठी संधी निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एका ‘एक्स’ पोस्टमध्ये विजय केडिया यांनी उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांना टॅग करत म्हटले, “प्रिय आनंद महिंद्राजी आपले पंतप्रधानदेखील देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देत आहेत आणि यामुळे महिंद्रा हॉलिडेजसाठीला एक मोठी संधी निर्माण आहे, असे मला मनापासून वाटते.”

भारतीयांच्या पर्यटनाच्या आवडीचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले, “आज भारतात एक वेगाने वाढणारा श्रीमंत आणि महत्त्वाकांक्षी मध्यमवर्ग तयार झाला आहे, जो अनुभवात्मक कौटुंबिक प्रवासाला अधिक पसंती देत आहे, तरीही क्लब महिंद्रामध्ये भारतात अजूनही केवळ सुमारे ३ लाख सदस्य कुटुंबे आहेत. वाढीसाठी प्रचंड वाव असल्याचे दिसते.”

“भारताचे हॉस्पिटॅलिटी चक्र मजबूत आहे, ब्रँड क्लब महिंद्रावर ग्राहकांचा प्रचंड विश्वास आहे आणि बुकिंगची संख्याही चांगली आहे, तरीही परदेशी हॉलिडे क्लब व्यवसायामुळे होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे भारतातील व्यवसायाचे खरे मूल्य झाकोळले जात आहे असे दिसते. कदाचित आता युरोपियन उपकंपनीला वेगळे करणे, पुनर्रचना करणे, विलीनीकरण रद्द करणे किंवा तिच्यावरील अवलंबित्व कमी करणे, जेणेकरून भारतातील व्यवसायाचे त्याच्या स्वतःच्या गुणवत्तेवर स्वतंत्रपणे मूल्यांकन केले जाऊ शकेल अशा बदलांची वेळ आली आहे”, असे विजय केडिया म्हणाले.

“याव्यतिरिक्त, कमी भांडवली विस्तार, तरुण पिढीला आकर्षित करणारे ब्रँडिंग, डिजिटल सहभाग आणि आधुनिक हॉस्पिटॅलिटी विचारांवर अधिक लक्ष केंद्रित केल्यास, येत्या काही वर्षांत भागधारकांसाठी खूप मोठे मूल्य निर्माण होऊ शकते. महिंद्रा समूह आणि आपल्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल अत्यंत आदर आणि कौतुकासह एका जागरूक दीर्घकालीन भागधारकाचे हे मत आहे”, असे ते पोस्टच्या शेवटी म्हणाले.

महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स काय आहे?

विविध व्यवसाय करणाऱ्या महिंद्रा ग्रुपचा एक भाग असलेली महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड ही भारतातील एक आघाडीची हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे. १९९६ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी तिच्या ‘क्लब महिंद्रा’ या प्रमुख ‘व्हॅकेशन ओनरशिप’ ब्रँडसाठी ओळखली जाते.

कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२६ च्या गुंतवणूकदार सादरीकरणानुसार, महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्सचे ३ लाखांहून अधिक सदस्य आहेत. तसेच जगभरात कंपनीचे सुमारे १६० रिसॉर्ट्स सुमारे १०० भागीदार हॉटेल्स आहेत. कंपनीचा हा स्वतंत्र व्यवसाय पूर्णपणे कर्जमुक्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे.