Vijay Thalapathy TVK Lead : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये आज सर्वत्र एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे दक्षिणेतील सुपरस्टार आणि ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे संस्थापक विजय. प्रस्थापित राजकीय शक्तींना धोबीपछाड देत विजय यांच्या पक्षाने घेतलेली मुसंडी थक्क करणारी आहे. मात्र, या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, विजय यांच्याशी संबंधित एका जुन्या प्राप्तिकर वादाची चर्चा पुन्हा रंगली आहे. त्यांच्या ‘पुली’ चित्रपटाशी संबंधित असलेल्या या वादात त्यांना तब्बल १.५० कोटी रुपयांचा दंड भरावा लागला होता.

विजय यांचा तमिळनाडूत ऐतिहासिक विजय

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत विजय यांचा टीव्हीके पक्ष १०७ जागांवर आघाडीवर असून, त्यांनी सत्ताधारी डीएमके (७२ जागा) आणि एआयडीएमके (५५ जागा) यांसारख्या दिग्गज पक्षांना मागे टाकले आहे. जरी बहुमताचा आकडा ११८ असला, तरी विजय यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

३० सप्टेंबर २०१५ रोजी ‘पुली’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्राप्तिकर विभागाने विजय आणि चित्रपटाच्या निर्मात्यांच्या घरांवर छापेमारी केली होती. तपासात असे आढळले की, विजय यांना या चित्रपटासाठी एकूण २१ कोटी रुपये मिळाले होते. त्यापैकी १६ कोटी रुपये चेकने, तर ४.९३ कोटी रुपये रोख स्वरूपात देण्यात आले होते. छापेमारी दरम्यान विजय यांनी ही रक्कम स्वीकारल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्यांनी आपला प्राप्तिकर परतावा पुन्हा भरला आणि एकूण उत्पन्न ३५.४२ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले.

दीड कोटींचा दंड आणि न्यायालयाचा निकाल

प्राप्तिकर विभागाच्या मते, विजय यांनी ही माहिती स्वतःहून दिली नसून छापेमारीत पकडले गेल्यावर नाईलाजास्तव दिली होती. यामुळे विभागाने त्यांच्यावर १० टक्के म्हणजेच १.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. या दंडाविरोधात विजय यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, फेब्रुवारी २०२६ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने हा दंड भरावाच लागेल, असा स्पष्ट निकाल दिला.

विरोधकांकडून घेरण्याची तयारी

विजय यांचे संपूर्ण राजकारण हे ‘भ्रष्टाचार विरोधी’ आणि ‘प्रामाणिकपणा’ या अजेंड्यावर आधारित आहे. अशा स्थितीत, ऐन विजयाच्या उंबरठ्यावर असताना विरोधकांनी या जुन्या प्रकरणाचा आधार घेत त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार पक्षाचे अध्यक्ष विजय स्वतः मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील.