Virat Kohli Real Estate Investment Portfolio following his new multi-crore property deal in Mumbai: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबईतील वर्सोवा येथे १८.२९ कोटी रुपयांना एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. या खरेदीमुळे विराट आणि अनुष्काच्या रिअल इस्टेट मालमत्ता पोर्टफोलिओमध्ये आणखी एका आलिशान मालमत्तेची भर पडली आहे. या प्रसिद्ध जोडप्याने काही महिन्यांपूर्वीच अलिबागमध्ये सुमारे ३७.८६ कोटी रुपये किमतीचा भूखंड खरेदी केला होता. विराट सध्या अुष्का, वामिका आणि अकाय यांच्यासोबत लंडनमध्ये राहत असूनही, भारतातील त्याची रिअल इस्टेटमधील गुंतवणूक सातत्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मालमत्ता नोंदणी प्लॅटफॉर्म झॅपकी (Zapkey) नुसार, हा फ्लॅट अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा भागातील गोदरेज स्कायशोर प्रकल्पात वरच्या मजल्यावर आहे.
मालमत्ता नोंदणीच्या नोंदींवरून असे दिसून येते की, हा व्यवहार २१ जुलै २०२६ रोजी पूर्ण झाला आहे. या जोडप्याने या फ्लॅटच्या मुद्रांक शुल्कापोटी १.०९ कोटी रुपये आणि नोंदणी शुल्क म्हणून ३०,००० रुपये भरले आहेत. व्यवहाराचे मूल्य आणि कार्पेट एरिया यांचा विचार करता, हा फ्लॅट अंदाजे ६९,१५९ रुपये प्रति चौरस फूट दराने खरेदी केल्याचे समजते. यावरून मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये आलिशान निवासी प्रकल्पांना असलेली मोठी मागणी असल्याचे दिसते.
२०२६ मधील दुसरी मोठी गुंतवणूक
वर्सोवा येथील हा फ्लॅट विराट-अनुष्काची या वर्षातील रिअल इस्टेट क्षेत्रातील दुसरी मोठी गुंतवणूक आहे. जानेवारी २०२६ मध्ये, त्यांनी अलिबाग येथील आवास बीचजवळील झिराड गावात पाच एकरांहून अधिक जमीन अंदाजे ३७.८६ कोटी रुपयांना खरेदी केली आहे.
सीआरई मॅट्रिक्स’ (CRE Matrix) द्वारे मिळवलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांनुसार, या व्यवहारात जवळपास २१,०१० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या लगतच्या दोन भूखंडांचा समावेश होता आणि याची अधिकृत नोंदणी १३ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली आहे.
या खरेदीमुळे अलिबागमधील त्यांच्या मालमत्तेच्या आणखी भर पडली आहे. यापूर्वी २०२२ मध्ये या जोडप्याने जवळपास १९ कोटी रुपयांना आठ एकरांचा भूखंड खरेदी केला होता. तिथे त्यांनी नंतर एक आलिशान व्हिला उभारला, ज्यामध्ये तापमान-नियंत्रित स्विमिंग पूल, खास डिझाइन केलेले स्वयंपाकघर, जकूझी, बाग, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान आणि कव्हर्ड पार्किंग यांसारख्या सुविधा आहेत.
विराट कोहलीची रिअल इस्टेट मालमत्ता
गेल्या काही वर्षांत, कोहलीने भारतातील सेलिब्रिटींच्या सर्वात मौल्यवान रिअल इस्टेट पोर्टफोलिओपैकी एक पोर्टफोलिओ उभारला आहे. त्याच्या सर्वात प्रसिद्ध गुंतवणुकींपैकी एक म्हणजे मुंबईतील वरळी येथील सी-फेसिंग आलिशान फ्लॅट. हा फ्लॅट २०१६ मध्ये ३४ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे वृत्त होते. ३५ व्या मजल्यावर असलेल्या या चार-बेडरूमच्या फ्लॅटचे क्षेत्रफळ सुमारे ७,१७१ चौरस फूट आहे. मात्र, नंतरच्या काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार याचे बुकिंग रद्द करण्यात आले होते.
मुंबईबाहेर, गुरुग्राममधील डीएलएफ फेज १ मध्येही कोहलीचे १०,००० चौरस फूट क्षेत्रफळाचे एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत सुमारे ८० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या मालमत्तेमध्ये खाजगी स्विमिंग पूल, आधुनिक जिम आणि अनेक उच्च-स्तरीय सुविधांचा समावेश आहे.
